*कोंकण एक्सप्रेस*
*किनारपट्टीवरील बांधकामाबाबत राज्य व केंद्र शासनाकडून धोरणात्मक निर्णय प्रक्रिया सुरू- मंत्री नितेश राणे*
*भाजपा मच्छिमार सेलने लक्ष वेधले*
*मालवण (प्रतिनिधी)*
किनारपट्टीवरील मत्स्य व पर्यटन व्यवसायिक तसेच निवासी घरे यांना प्रशासनाने सीआरझेड कायदा अंतर्गत नोटीसा बजावल्याने या संदर्भात मालवणच्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब, श्रमिक मच्छीमार संघटनेचे सन्मेश परब यांच्यासह किनारपट्टीवरील नागरिकांनी भाजप मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांच्या समवेत राज्याचे बंदरे व मत्स्योद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन लक्ष वेधले. किनारपट्टीवरील बांधकामाबाबत राज्य व केंद्र शासनाकडून धोरणात्मक निर्णय प्रक्रिया सुरू असून प्रशासनाने बजावलेल्या नोटिसा बाबत किनारपट्टीवरील लोकांनी चिंता करू नये लवकरच याबाबत तोडगा निघेल, असे आश्वासन ना. नितेश राणे यांनी यावेळी दिले.
किनारपट्टीवरील निवासी घरे, मत्स्यव्यवसाय संबंधित जागेचा वापर तसेच पर्यटन व्यवसाय, घर दुरुस्ती, बांधणी व इतर अनुषंगिक गोष्टीसाठी होणाऱ्या त्रासाबद्दल यावेळी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी सदरचा विषय हा महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीचा असून याबाबत केंद्र व राज्य शासनाचा माध्यमातून धोरणात्मक निर्णय लवकरच होणार असल्याचे सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सदरच्या कायद्यामुळे येणारे अडथळे याबाबत सुद्धा मार्ग निघणार आहे, असे सांगितले. सदर विषयात केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक भविष्यातील धोरणात्मक निर्णयामुळे किनारपट्टी समुदायाला मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासन स्तरावर याबाबत खासदार नारायण राणे आणि राज्य शासनाकडे मंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा चालू आहे, असे यावेळी ना. राणे यांनी सांगितले.
यावेळी नोटिसा बजावलेल्यांपैकी नागरिक उपस्थित होते. तसेच भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या शिवसेना उबाठा पक्षाच्या च्या माजी नगरसेविका सौ. सेजल परब व उपशहर प्रमुख सन्मेश परब यांना भाजप मधील भावी वाटचालीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोनी फर्नांडिस, कुशल गिरकर, नामदेव केळुसकर, विवि फर्नांडिस, रूपेश प्रभु व इतर उपस्थित होते.