*कोंकण एक्सप्रेस*
*कुंभारमाठ येथील बंद घर चोरट्यांनी फोडले*
*मालवण (प्रतिनिधी)*
मालवण तालुक्यातील कुंभारमाठ परिसरात गेल्या काही दिवसात चोऱ्यांचे सत्र सुरु असतानाच कुंभारमाठ गोवेकर वाडी मार्गावरील स्वयंभूवाडी येथील तुषार (बाबू) कासवकर यांचे बंद घर चोरट्यानी फोडले. घरात आलेली सुमारे १० ते १५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यानी लंपास केली. या परिसरात गेल्या काही दिवसातील चोरीची ही तिसरी घटना असल्याचे तुषार कासवकर यांनी सांगितले.
कासवकर कुटुंबीय उद्योग व्यवसाय व मुलांच्या शिक्षणानिमित्त मालवण येथे राहतात. चार-आठ दिवसांनी ते घरी फेरी मारतात. शनिवारी सायंकाळी ते घरी गेले असता घराचे लॉक तुटलेले त्यांना दिसले. त्यांनी आत पाहिले असता कपाट फोडून साहित्य पसरलेले होते. व्यवसायात लागणारे सुट्टे पैसे नाणी कासवकर यांनी बँकेतून आणून घरात ठेवले होते. त्या पैशांवर चोरट्यानी डल्ला मारला.
दरम्यान कासवकर यांनी मालवण पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. दोन रुपयाची नाणी असलेल्या दोन बॅग चोरट्यानी चोरल्या असून मोठ्या प्रमाणात दोन रुपयाची नाणी कोणी व्यवसायिकांना द्यायला आल्यास खात्री करण्याचे आवाहन बाबू कासवकर यांनी केले आहे.