*कोंकण एक्सप्रेस*
*रिल्सचे हिरो बनण्यापेक्षा रिअल हिरो बना
गणेश कांबळी यांचे आवाहन, गाबीत समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार*
*वेंगुर्ले ः प्रथमेश गुरव*
वर्तमानपत्रांचे अनॅलिसिस करायला शिका. आपल्या सिंधुदुर्गचा दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल कितीही लागला तरी येथील विद्यार्थी तोपर्यंत सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळवू शकणार नाही जोपर्यंत तो अवांतर वाचन करत नाही. कारण त्या परीक्षेत दहावी, बारावी, पदवीचे केवळ शिक्षण उपयोगी ठरत नाही. तुम्हाला अनॅलिटीकल थिंकिंगवर काम करावे लागते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायंटिस्ट, डिजिटल मार्केटिंग, सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट, हेल्थ केअर स्पेशालिस्ट, ह्युमन रिसोर्स मॅनेजर अशा अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन नंदकिशोर परब यांनी केले.
वेंगुर्ले नगरपालिकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या सोहळ्याला वेंगुर्ले गाबीत समाजाचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, स्टेट बॅंकेचे निवृत्त मॅनेजर दिलीप गिरप, शिरोडा माजी सरपंच बाबा नाईक, मनोज उगवेकर, माजी नगरसेविका श्वेता हुले, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती दादा कुबल, प्रमुख मार्गदर्शक मानव संसाधन संस्थेचे नंदकिशोर परब, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक राजेश मोंडकर उपस्थित होते.
हवाई क्षेत्रात एअर क्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर, कॅटरिंग विभाग, लायझनिंग विभागात, सायबर सेल अशा संधी उपलब्ध आहेत. एआय संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्यावा. हे चित्र बदलावे. एक रिक्षा ड्रायव्हर आमच्याकडे कॅप्टन आहे. एक रिक्षावाला कॅप्टन बानू शकतो. मग तुम्ही का नाही, याचा विचार करा. सोशल मीडियावर रिल्सचे हिरो बनण्यापेक्षा रिअल हिरो बना, असे आवाहन इंडिगो विमान कंपनीचे मॅनेजर गणेश कांबळी यांनी येथे केले. वेंगुर्ले गाबीत समाज बांधव आयोजित गाबीत समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. आपल्या समाजासाठी कुणी काही करत नाही. हे कार्य माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप करत आहेत. ते कौतुकास्पद आहे. या समाजातील लोक वरिष्ठ पदावर यावेत, या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. मी वरिष्ठ पदावर गेलो. त्याआधी मी इंग्रजी वृत्तपत्र वाचन करायला शिकलो. हे अत्यंत आवश्यक असल्याचेही श्री.कांबळी यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे उदघाटन दीप प्रज्ज्वलन आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन गिरप यांनी केले. त्यांनी असा सत्कार सोहळा प्रथमच आयोजित केल्याचे सांगत गाबीत विकास महामंडळाच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. तसेच समाज बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी समाजातील दहावी, बारावी आणि पदवी, पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत ६० विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक नंदकिशोर परब, दिलीप गिरप, गणेश कांबळी, राजेश मोंडकर, पत्रकार आबा खवणेकर यांचा सत्कार करण्यात आला. बारावीच्या विद्यार्थ्यांना बापू गिरप लिखित स्वयंविकासाच्या वाटेवर हे पुस्तक भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून वेंगुर्ले पालिकेने स्वच्छता अभियानात कोकणात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल स्वच्छता निरीक्षक प्रवीण कांबळे, सफाई कर्मचारी राजश्री वराडकर यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाबुराव खडपकर यांनी केले.