*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड शेअर मार्केट घोटाळा प्रकरणी श्रध्दा मोंडकर हिला जामीन मंजूर*
*आरोपी तर्फे अॅड. कौस्तुभ मराठे यांनी केला यशस्वी युक्तीवाद*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
देवगड शेअर मार्केट घोटाळा प्रकरणी आरोपी श्रध्दा मोंडकर हिने जनतेपैकी १२ लोकांना उच्च परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेली संशयित आरोपी श्रध्दा प्रकाश मोंडकर हिला सिंधुदुर्ग मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. पी. झपाटे यांनी रु. ५०,०००/- च्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. या कामी जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी महिलेचे वतीने देवगड येथील अॅड. कौस्तुभ मराठे यांनी युक्तीवाद केला तर अॅड. गिरीश भिडे यांनी त्यांना सहाय्य केले.
देवगड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी प्रशांत राऊत, ज्योती जाधव, निकिता मुणगेकर, सेजय चौकेकर, रागिणी मणचेकर, नैना कोयंडे, संजय भावे, सुरेश तेली, आशिष कानडे, प्रिती बागवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी श्रध्दा प्रकाश मोंडकर हिने माहे एप्रिल २०२३ ते जून २०२५ या कालावधीत देवगड शहरातील एकूण १२ लोकांकडून रक्कम रु. २९,७१,४००/- रुपयांच्या ठेवी घेऊन त्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे व डबल पैसे मिळवून देण्याचे वचन देऊन लोकांना ते परत केले नव्हते. पोलीसांनी संशयित महिले विरुध्द ठेवीदार हितरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४०९, ४०६, ४२० व महा ठेवी सुरक्षा अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवगड पो. स्टे मधील ठेवीदार हितरक्षण कायद्याखालील हा पहिलाच गुन्हा होता. गुन्हयाचे तपासात अजून १२ लोकांचे पैसेही अशाच रितीने बुडाल्याचे निष्पन्न झाले होते. तपासात संशयीत महिलेने देवगड येथे टोलेगंज बंगला, गाड्या इत्यादी मालमत्ता केल्याचे ही दिसून आले होते. या कामी तपास चालू असून अद्याप दोषोराप पत्र दाखल झालेले नाही. मात्र देवगड पोलीसांनी चुकीच्या पध्दतीने कलमे लावल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे तसेच जिल्हाधिकारी यांचेकडील अहवाल आला नसल्याने न्यायालयाने संशयित आरोपी महिला हिला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.