साळशी गावात… भल्ली भल्ली भावय…

साळशी गावात… भल्ली भल्ली भावय…

*कोंकण एक्सप्रेस*

*साळशी गावात… भल्ली भल्ली भावय…*

*शिरगांव : संतोष साळसकर

आज कर्क संक्रातीच्या दिवशी शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री सिद्धेश्वर पावणाई देवालयासमोर हर हर महादेवची घोषणा देत, ढोल ताशांच्या गजरात, एकमेकांवर खेळीमेळीच्या वातावरणात चिखल फेक करीत… भल्ली भल्ली भावय उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. या उत्सवापासून श्री पावणाई देवीच्या वार्षिकची सुरुवात होते.
या दिवशी सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून देवीला नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर बारा पाच मानकरी, ग्रामस्थ एकत्र मिळून भावई देवीकडे या उत्सवाला सुरुवात करून श्री पावणाई देवी देवालयासमोर ढोल ताशांच्या गजरात ‘भल्ली भल्ली भावय… ‘ असे म्हणत जल्लोषपूर्ण भक्तिमय वातावरणात भावई खेळली जाते. यावेळी गावातील सर्व लहान थोर मंडळी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांवर चिखल फेक करीत हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो.
यावेळी होळदेव कडील भला मोठा सुमारे १०० किलोच्या आसपास असणारा दगड प्रत्येक जण दोन्ही हातांनी योग्य पकड देऊन शक्तिप्रदर्शन करून उचलण्याचा प्रयत्न करतात हे बघण्यासारखे असते.
त्यानंतर जमिनीत ( चिखलात ) पुरण्यात आलेला नारळ प्रत्येकजण आपल्या हस्त कौशल्याने काढण्याचा प्रयत्न करतात. जमिनीमध्ये चिखलात नारळ पुरण्यात येतो. त्याच्या सभोवती सर्वजण झोपून तो काढण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. त्याला ‘सापड खेळणे’ असे म्हणतात.
त्यानंतर सर्वजण चौऱ्यांशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम करतात. त्यानंतर पुन्हा सर्वजण श्री पावणाई देवालयासमोर एकत्र येऊन काल्पनिक रित्या शिकारीचा खेळ खेळला जातो. यावेळी शिवकाळा म्हणजे अवसर- तरंग काढण्यात येतो. या शिवकळेकडे शिकार मानवून शिकारीचे मुंडके ( प्रतीकात्मक झाडाच्या पानांचा टाळ ) ढोल ताशांच्या गजरात मिराशी कुटुंबीयाकडे नेला जातो. तिथे त्याची पूजाअर्चा करून सर्वजण भोजनाचा आस्वाद घेतात.
या दिवशीच्या आदल्या दिवशी देसरुड काढण्यात येते. शेती हंगाम असून देखील शेतकऱ्यांना विरंगुळा व आनंद देणारा हा भावई उत्सव सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करतात. यावेळी देवस्थान कमिटीचे चेअरमन योगेश मिराशी तसेच इतर विश्वस्त, पदाधिकारी, बारा पाच मानकरी, ग्रामस्थ, पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक या उत्सवाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!