*कोंकण एक्सप्रेस*
*जगाचा पोशिंदा धनाने कमी असेलही पण मनाने मात्र श्रीमंतच*
*संभाजी साटमः कर्ले महाविधालयात कृषी साप्ताह साजरा*
*देवगड : प्रशांत वाडेकर*
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी दिवसरात्र राबून धान्य पिकवित असताना अनेक समस्यांना सामोरे जातो.त्याच्या कष्टाची जाणीव सर्वांनी ठेवायला हवी. पारंपारिक शेतीला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने कमीतकमी जागेत जास्त उत्पन्न घेणे शक्य झाले आहे. शेती आता उद्योगात गणली जात असल्याने जगाच्या पोशिंद्याला कमी लेखण्याची चूक कधीही करू नका. तो धनाने कमी असेलही मात्र मनाने श्रीमंतच आहे. असे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम यांनी केले.
शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलीत देवगड तालुक्यातील शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि ग्रीन क्लब या विभागांच्यावतीने १ ते ७ जुलै या कालावधीत कृषीसप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सप्ताहाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्याशी संवाद साधताना संभाजी साटम म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणांनतर सर्वांचा ओढा डॉक्टर, इंजिनिअर,वकील, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राकडे आहे. पण शेतकरी व्हायला कोण तयार नसतात. शेतीच्या क्षेत्रातही रोजगाराच्या अनेक संधी दडल्या आहेत मात्र जिद्दीने आणि चिकित्सकपणे मेहनत करण्याची तयारीने शोधल्या पाहीजेत.बहुतांशी विद्यार्थी हे ग्रामिण भागातून येतात शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांनी कृषी पर्यटनासाखी संकल्पना राबविण्यास पुढाकार घ्यावा. असे मार्गदर्शन केले.
कृषी साप्ताहाच्या कालावधीत नागरीकांना शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी महाविद्यालयापासून बाजारपेठेपर्यत जनजागृती रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर उतरून विद्यार्थ्यानी भात लावणीचे धडे गिरविले. महाविद्यालयाच्या परिसराची साफसफाई करून कचरा व्यवस्थापन परिसर स्वच्छता, वृक्षलागड यासारखे उपक्रम राबविण्यात आले. शिरगांव धोपटेवाडी येथिल समर्थ नर्सरी या रोपवाटीकेला विद्यार्थ्यांनी भेट देऊन नारळ, हापुस आंबा, काजू, फणस, रतांबा, लिची, स्टार फ्रुट या फळझाडांच्या विविध जातींची वेगवेगळया फुलझाडांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी टायकुळा, अळु, शेवगा, करटोली, फोडशी, भारंगी, कुड्याच्या शेंगा, राजगिरा या सारख्या रानभाज्याचे प्रदर्शन व विविध प्रकारच्या पाककृतीचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका कोमल पाटील, ग्रीन क्लब विभागप्रमुख प्राध्यापिका सोनाली ताम्हणकर,अक्षता मोंडकर,सुगंधा पवार, मयूरी कुंभार, सिद्धी कदम, प्राध्यापक आशय सावंत आदी उपस्थित होते