*कोंकण एक्सप्रेस*
*हळबे महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त व्याख्यान*
*दोडामार्ग: शुभम गवस*
भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही परंपरा अनादी काळापासून चालत आलेली असून समाजाच्या बौद्धिक आणि नैतिक उभारणीचा मूलभूत पाया मानली जाते. पूर्वी ज्ञानार्जन करताना राजपुत्रालाही सर्व राजसुखांचा त्याग करून गुरुकुलात जावे लागत असे. त्यामुळे गुरू हे केवळ शिक्षक नसून शिष्याच्या जीवनविकासात सक्रिय भूमिका बजावणारे मार्गदर्शक मानले जात. अशा गुरूंप्रती आदरभाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माजी प्राचार्य डॉ. हेमंत पेडणेकर यांनी केले. ते हळबे महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित व्याख्यानादरम्यान बोलत होते. यावेळी डॉ. पेडणेकर यांनी ‘गुरू-शिष्य परंपरा: काल, आज आणि उद्या’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कालसुसंगतपणे प्राचीन काळातील गुरुकुल व्यवस्थेपासून ते आजच्या तंत्रज्ञानाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला. आज गुरूंना नव्या पिढीला समजून घेत वैचारिक पातळीवर संवाद साधणे गरजेचे आहे तर विद्यार्थ्यांनीही काळानुरूप स्वतःमध्ये जिज्ञासा, ज्ञानार्जनाची उत्सुकता आणि सातत्यशील अभ्यासाची वृत्ती बाळगावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक हे विद्यार्थ्यांना तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणारे खरे मार्गदर्शक असल्याचे सांगितले. शिक्षकांप्रमाणे पुस्तकांनाही गुरू मानण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. समाजमाध्यमांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक आणि पुस्तके हेच योग्य मार्गदर्शक ठरू शकतात. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिस्त, लीनता आणि विद्यार्जनाची आवड जोपासली पाहिजे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. पेडणेकर यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमूख डॉ. सोपान जाधव, सुत्रसंचालन कु. सानिया गवंडळकर तर आभारप्रदर्शन कु. प्रीती जाधव हिने केले.