*कोंकण एक्सप्रेस*
*नाना पालकर स्मृती समिती बोरिवलीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. अमेय देसाई यांच्याकडे सुपूर्त – गुरुपौर्णिमेच्या दिवशी उत्साहात पदग्रहण*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी नाना पालकर स्मृती समिती बोरिवली च्या अध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. अमेय प्रदीप देसाई यांच्याकडे औपचारिकपणे सुपूर्त करण्यात आली. समितीच्या बोरिवली भागात गेल्या काही वर्षांत आरोग्यसेवेसह रुग्णकल्याणाच्या क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या या संस्थेच्या नेतृत्वाची धुरा डॉ. देसाई यांनी स्वीकारली.
या प्रसंगी नाना पालकर स्मृती समितीच्या केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. परेश नवलकर, सहसचिव श्री. प्रवीण परब, मुख्यालय व्यवस्थापक श्री. कृष्णा महाडिक, तसेच बोरिवली विभागाचे मागील पाच वर्षांतील पदाधिकारी आणि नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
संस्थेची गेल्या काही वर्षांत झालेली उल्लेखनीय कामगिरी खालीलप्रमाणे आहे:
मागील ५ वर्षांत ३०,६८२ डायलिसिस सेशन्स
मागील ३ वर्षांत ८,२४७ केमोथेरपी सेशन्स
१८,६३१ रक्ततपासण्या
मागील २ वर्षांत ३६,८१८ बाह्यरुग्ण लाभार्थी
मागील एका वर्षात ८,४५९ फिजिओथेरपी रुग्ण
तसेच १,५२८ रुग्णोपयोगी साहित्य लाभार्थी
या सर्व कामगिरीने संस्था समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पुरवण्यात अत्यंत मोलाचे कार्य करत आहे.
डॉ. अमेय देसाई यांनी अध्यक्षपद स्वीकारताना सांगितले की, “ही जवाबदारी स्वीकारताना मला अतिशय अभिमान आणि एकवटलेली जबाबदारीची जाणीव होते आहे. हे कार्य केवळ सामाजिक सेवा नव्हे, तर हे नाना पालकर यांच्या तेजोमय कार्याचा वारसा पुढे नेण्याचे पवित्र कार्य आहे. या कार्याला अधिक व्यापक, प्रभावी आणि टिकाऊ बनवण्याच्या दिशेने धोरणात्मक व्यूहरचना करणे हेच माझे ध्येय राहील.”
त्यांच्या या नियुक्तीबद्दल समितीच्या सदस्यांनी आनंद व्यक्त केला असून, बोरिवली विभागात नाना पालकर स्मृती समितीचे कार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.