व्यसनापासून लांब रहा ; सौ. अर्पिता मुंबरकर

व्यसनापासून लांब रहा ; सौ. अर्पिता मुंबरकर

*कोंकण एक्सप्रेस*

*व्यसनापासून लांब रहा ; सौ. अर्पिता मुंबरकर*

*साळशी केंद्रशाळेत व्यसनमुक्ती जनजागृती अभियान कार्यक्रम*

*शिरगांव ः संतोष साळसकर*

व्यसन ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. त्यापासून लांब रहा. आजकाल व्यसनाचा आधार घेत प्रत्येक जण सण, उत्सव साजरा करताना दारूची पार्टी केली जाते ही खरच समाजासाठी घातक गोष्ट आहे. प्रत्येकाने स्वतःपासून निर्व्यसनी राहायचा प्रयत्न केला तर पुढची पिढी निरोगी, निर्व्यसनी आणि निकोप होईल असे नशाबंदी मंडळ महाराष्ट्र च्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सौ. अर्पिता मुंबरकर यांनी बोलताना व्यक्त केले.
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने देवगड तालुक्यातील साळशी ग्रामपंचायत आणि पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक यांच्या वतीने नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत येथील केंद्र शाळा साळशी येथे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साळशी गावच्या सरपंच सौ वैशाली सुतार, उपसरपंच पांडुरंग मिराशी, पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, माजी सरपंच वैभव साळसकर, सौ विशाखा साळसकर, साळशी हायस्कूलचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, केंद्र शाळेचे केंद्र मुख्याध्यापक गंगाधर कदम, विजय सुतार, प्रभाकर साळसकर, विक्रांत नाईक, साळशी देवणेवाडी अंगणवाडी सेविका सौ. प्रतीक्षा शिवलकर मदतनीस संध्या नाईक, गावकरवाडी अंगणवाडी सेविका सौ. अस्मिता मेस्त्री , मदतनीस सौ. सुविधा किंजवडेकर, घाडीवाडी अंगणवाडी सेविका सौ मनीषा नाईक, मदतनीस रसिका मिराशी, बचत गट सीआरपी सौ. ऋतुजा घाडी, सौ लक्ष्मी साळसकर, महिला सदस्या सौ. हर्षदा नाईक, ग्राम संघ सचिव समता साळसकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य आदिसह ग्रामस्थ, महिलावर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली. तसेच साळशी हायस्कूल ते प्राथमिक शाळेपर्यंत मुलांनी व्यसन विरोधी विविध घोषणा देऊन प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी बोलताना सौ. अर्पिता मुंबरकर म्हणाल्या की, दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट, ड्रग्स मुळे आजची पिढी बरबाद होत चालली आहे. जगात आपला भारत देश तरुणांचा देश मानला जातो. मात्र दरवर्षी १३ लाख तरुण ड्रग्समुळे मृत्युमुखी पडत आहेत ही चिंताजनक बाब आहे. तंबाखूजन्य पदार्थ टाळा आणि वेळीच सावध व्हा. आपले संत महात्मे, महामानव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला समाज व्यसनमुक्त करा. असे विचार सौ. मुंबरकर यांनी मांडले.
यावेळी सरपंच सौ. वैशाली सुतार यांनी व्यसनमुक्ती वर मुलांना मार्गदर्शन करताना या बालवयातच मुलांना चांगले संस्कार झाले तरच पुढची भावी पिढी व्यसनापासून दूर राहील. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी व्हायला पाहिजे. असे सांगत स्वस्त रहा आणि सुखी रहा असा संदेश दिला. या व्यसनमुक्ती कार्यक्रमाच्या दरम्यान हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ” व्यसनमुक्तीची वारी… विठ्ठलाच्या दारी” हा विचार घेऊन व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती फेरी काढून घराघरात संताचा, महापुरुषांचा संदेश पोहचविला. यावेळी सौ. अर्पिता मुंबरकर यांनी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांची ‘महामानवांचे व्यसनमुक्तीपर विचार’ ही पुस्तिका प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर कदम यांना भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय मराठे यांनी मांडले यावेळी व्यसनमुक्ती वर सर्वांनी शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!