*कोंकण एक्सप्रेस*
*वाचनालयाने काळाप्रमाणे बदलणे सध्याची गरज : अॅड.प्रभूखानोलकर*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
कम्युनिकेशन माध्यमे खूप प्रगतीपथावर आहेत. सध्या एका क्लिकवर सर्व माहिती मिळते. त्यामुळे १५४ वर्षांच्या वाचनालयाने काळाप्रमाणे बदलणे ही सध्याची गरज आहे. संस्था पदाधिका-यांच्या भावना निःस्वार्थी असतील, तरच दाते पुढे येत असतात. संस्थेचे काम हे निःपक्षपाती सुरू आहे, हेच संस्थेचे बलस्थान आहे, असे प्रतिपादन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांनी केले.
वेंगुर्ला नगर वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ ते रोजी संस्थेचे अध्यक्ष अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात झाली. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर, उपाध्यक्ष अॅड.देवदत्त परूळेकर, कार्यवाह कैवल्य पवार आदी उपस्थित होते. बालसाहित्यिक चळवळ, बालवाचक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी संस्थेतर्फे पुढील वर्षीपासून बालसाहित्यिक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बालसाहित्यिकांची संख्या व त्यांचे लेखन साहित्य आदी गोष्टींचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. यापुढे संस्थेतर्फे साहित्यिक व ग्रंथालय क्षेत्रास पुरक असे पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात येतील अशी माहिती अनिल सौदागर यांनी दिली.
वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे दर चार वर्षांनी देण्यात येणारा सौ.प्रतिभा विठ्ठल रेगे स्मृती सेवा पुरस्कार यावर्षी संस्थेचे कर्मचारी दिगंबर उर्फ मिथून सातार्डेकर यांना अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर यांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ व रोख ५ हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वार्षिक सभेत २०२५/२६ करीता अंतर्गत हिशोब तपासनीस म्हणून श्रीनिवास सौदागर यांची निवड करण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले. २०२४-२५ या वर्षात निधन झालेल्या संस्थेच्या सभासदांना, मान्यवरांना, देणगीदारांना, साहित्यिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यवाह कैवल्य पवार यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन व जामखर्च अहवाल व २०२५/२६ चा अर्थसंकल्प सादर केला. त्याला मंजूरी देण्यात आली. कार्यकारी मंडळ सदस्य महेश बोवलेकर यांनी आभार मानले.
फोटोओळी – मिथून सातार्डेकर यांना प्रतिभा रेगे स्मृती सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.