अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा – भाजपा वेंगुर्ला यांच्यातर्फे आयोजन

अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा – भाजपा वेंगुर्ला यांच्यातर्फे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा – भाजपा वेंगुर्ला यांच्यातर्फे आयोजन*

भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शौर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यांचे न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजेवर असलेली मायेसारखी तळमळ, तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यामधील सहभाग यामुळे त्या “एक आदर्श शासिका आणि जनसेविका” म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या जीवनातून तरुण पिढीला शौर्य, सेवा आणि श्रद्धेचे मोल शिकण्यास मिळते.
२०२५ हे अहिल्याबाई होळकर यांचे ३००वे जन्मवर्ष असून, या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वर्षाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष, वेंगुर्ला यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकार्य, धर्मकार्य आणि न्यायपूर्ण शासन यांची त्रिसूत्री अचूकपणे जपणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात असल्याचे या अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सांगीतले .

स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत:

अहिल्याबाई होळकर : एक आदर्श शासिका आणि जनसेविका
किंवा

शौर्य, सेवा आणि श्रद्धेचा संगम : अहिल्याबाई होळकर

वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध किमान ७०० ते कमाल १००० शब्दांत
स्व: हस्ताक्षरात लिहिलेला निबंध भारतीय जनता पक्ष, वेंगुर्ला कार्यालयात प्रत्यक्ष हाती किंवा पोस्टाने पाठवावा. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणी साठी *सई चेंदवणकर* , *भाजपा कार्यालय – वेंगुर्ले* . मोबाईल नंबर – *7719983063* यांच्याशी संपर्क साधावा

सदर तालुकास्तरीय स्पर्धेतील पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत:

प्रथम क्रमांक : ₹१०००/-, चषक आणि प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक : ₹५००/-, चषक आणि प्रमाणपत्र

या दोन्ही विजेत्यांचे निबंध जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पाठवले जाणार आहेत. वेंगुर्ला तालुकास्तरीय स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹२०२५ /- आणि चषक व द्वितीय क्रमांकासाठी ₹१७२५ /- आणि चषक असे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी तसेच साहित्य व इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्ष, वेंगुर्ला यांच्या वतीने तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब यांनी केले आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जन्मवर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही निबंध स्पर्धा त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करणारी ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!