*कोंकण एक्सप्रेस*
*’त्या’ दोन्ही महसूलच्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा*
*परशुराम उपरकर यांची पत्रकार परिषदेतून मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जिल्हाधिकाऱ्यांपूर्वी सर्वांना बाजूला करून जाणारे आणि सिंधुदुर्गातही बीड पॅटर्न राबविणारे महसूलचे कर्मचारी व्ही. व्ही. कंठाळे व एस. पी हांगे यांचे केवळ निलंबन नको तर त्यांना बडतर्फ करण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया उद्धवसेनेचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी व्यक्त केली आहे.
कणकवली येथे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, महसूलचे कर्मचारी कंठाळे व हांगे हे बीड पॅटर्नप्रमाणे या जिल्ह्यात वागण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात युद्धजन्य परिस्थिती असताना तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उच्च दर्जाची सुरक्षा असताना देखील कोणीतरी कर्मचारी जर मुख्यमंत्र्यांना व उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना बाजूला करून भेटत असतील, तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून प्रोटोकॉल ऑफिसरला भेटल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी होऊन त्यानंतर भेट दिली जाते.
मात्र या दोन्ही कर्मचाऱ्यांचे हे बीडचे कौशल्य असून त्यांना कोकणी हिसका दाखविण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणार असे सांगणारे जिल्ह्याचे पालकमंत्री करतात काय? शिस्त आणणारे, शिस्तीत वागणारे असे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतःला म्हणवून घेत असताना मुख्यमंत्री जिल्ह्यात आल्यावर पालकमंत्री यांच्यासमोरच साधा तलाठी आणि मंडळ अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना बाजूला टाकून मुख्यमंत्र्यांना भेटायला जाऊ शकतो. मी कधीही जिल्ह्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड करणार नाही असे सांगणारे पालकमंत्री आता काय करताहेत ? असा सवाल परशुराम उपकर यांनी केला आहे.
दरम्यान, माजी आमदार वैभव नाईक यांनी या प्रकरणात लक्ष वेधल्यानंतर ही कारवाई झाल्याचे उपरकर यांनी स्पष्ट केले.