*कोंकण एक्सप्रेस*
*शाळेच्या आवारात रात्रीच्या वेळी होतायत मद्यपींच्या पार्ट्या*
*शिक्षकाने उठविला आवाज अन् लागले सीसीटीव्ही*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
देवगड सडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रवेशद्वारावर मद्यपी रात्रीच्या वेळेस दारू पिण्यासाठी बसतात. पार्ट्या कातरत. दारू पिल्यानंतर दारूच्या बॉटल किंवा टीन प्रवेशद्वारावर टाकून जातात. तसेच शाळेच्या पाण्याची पाईपलाईन, कनेक्शन तोडून नुकसान करतात. तसेच घाण करुन ठेवत असल्याबाबत शाळेतील शिक्षक सचिन जाधव यांनी ही गोष्ट सोशल मिडियावर शेअर करीत लोकप्रतिनिधी व जनतेच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेची तात्काळ दखल घेत भाजपचे देवगड जामसंडे युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील यांनी शाळेच्या परिसरात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.
दयानंद पाटील यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी समाजकंठकांकडून अशा प्रकारे होत असलेली कृत्ये वेळीच रोखण्याची गरज आहे. देवगड शहरात अवैध दारू व्यवसाय सध्या जोमात सुरु असून पोलिसांकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. देवगड जामसंडे शहरामध्ये देवांच्या नावाने सोशल क्लब सुरु असून या सोशल क्लबच्या माध्यमातून अवैध दारू, मटका व जुगार बेधडक सुरु आहे. यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.