*कोंकण एक्सप्रेस*
*वेदना निराकारणाचे मूळ लोकसाहित्यात : प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर*
*वत्सला प्रतिष्ठानच्या द्रौपदी कुंभार स्मृती पुरस्काराने पौर्णिमा केरकर व मालती मेस्त्री गोपुरी येथील कार्यक्रमात सन्मानित.*
*कणकवली ः प्रतिनिधी*
” जगभरच्या लोकसाहित्यात माणसाच्या वेदना निराकारणाचे मूळ आहे.कष्टकरी व शेतक-यांच्या जगण्याची वेदना दूर करण्यासाठी वेळोवेळी लोकगीते, लोकनृत्य व लोककलांचा पद्धतशीरपणे वापर परंपरामध्ये केलेला दिसून येतो. आजचा काळ हा धकाधकीचा काळ आहे. बदलत्या तंत्रज्ञानाने शेतीमधली सर्व पारंपारिक अवजारे गिळंकृत केली आहे. त्यामुळेच माणसा माणसा मधले अंतर वाढत गेले आहे. हे वाढत जाणारे अंतर आजच्या मानवाला धोकादायक ठरू शकते. हा धोका जर टाळायचा असेल तर लोक साहित्याचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल. कारण लोक साहित्याच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा विरंगुळा निर्माण होतो व माणसाकडून कोणतीही टोकाची भूमिका घेतली जात नाही. आजच्या बदलत्या काळात माणसं विकृत मनोवस्थेकडे वळताना दिसत आहेत. पुढचा भयंकर काळ जर टाळायचा असेल तर लोक साहित्याचे जतन आणि संशोधन होणे गरजेचे आहे. हे जतन आणि संशोधन पुन्हा एकदा माणसाने आपल्यामध्ये रुजवून घेऊन वेदनेचे निराकरण केले पाहिजे” असे प्रतिपादन गोपुरी, कणकवली येथे वत्सला प्रतिष्ठानच्या द्रौपदी कुंभार स्मृति लोकसाहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
वत्सला प्रतिष्ठान, कणकवलीच्या वतीने आयोजित केलेल्या द्रोपदी कुंभार स्मृती लोकसाहित्य पुरस्कार वितरण समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी वीरधवल परब, मराठीतील प्रसिद्ध ललित व कथालेखिका रश्मी कशेळकर, पुरस्कारार्थी पौर्णिमा केरकर, मालती मेस्त्री व वत्सला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता कुंभार उपस्थित होत्या.
शलाका प्रसाद मेस्त्री यांच्या लोकगीत गायनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
“लोकसाहित्य परंपरेतून आकाराला येत असते.लोकसाहित्य हे लवचिक, कथननिष्ठ आणि उत्स्फूर्त असल्यामुळे त्यातून मिळणारे रचनाबंध नागर – अनागर साहित्याला मौलिकता प्रदान करू शकतात. कोणत्याही साहित्य प्रकाराच्या मूळाशी असलेलं लोकतत्व समजावून घेतलं तर त्यातून अन्यायकारी व्यवस्थेच्या विरोधात पर्याय उभे राहू शकतात. लोकसाहित्यातील अनेक घटक वापरून व्यवस्थेला सशक्त पर्याय दिले असल्याची उदाहरणे दिसतात, तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र मराठीत काही अपवाद वगळता मुख्य साहित्य प्रवाहात लोकसाहित्याची गंभीर दखल घेतली गेली आहे असे चित्र दिसत नाही. मात्र प्रवीण बांदेकरांनी आपल्या कादंबऱ्यातून लोकरंगभूमीचे, लोककलेचे आकृतीबंध वापरून प्रयोगनिष्ठता जपली आहे. लोकसाहित्याला रंजनपर दु्य्यम लेखण्याची अभिजनांची खोड जुनीच आहे. परंतु लोकसाहित्य हे एक प्रकारचे सामान्य निरक्षर हेटाळणीच्या सुरात ग्राम्य समजल्या जाणाऱ्या लोकांचे कटोपनिषदच असते. ते मुख्यत्वे अभावातून येत असल्यामुळे जीवनाला खोल भिडणारेही असते. पौर्णिमा केरकर यांच्यासारख्या लोकसाहित्याच्या व्यासंगी संशोधक आणि संवर्धक यांना सन्मानित करून वत्सला प्रतिष्ठानने सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसाहित्याच्या संशोधन पर्वाची सुरवात केली. वत्सला प्रतिष्ठान कडून लोकसाहित्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष वीरधवल परब यांनी सांगितले.
संशोधन पुरस्कारार्थी पौर्णिमा केरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘आजचा हा लोकसाहित्याचा पुरस्कार स्वीकारल्यामुळे या क्षेत्रातली माझी निश्चितच जबाबदारी वाढली आहे.गोव्यातील एका कलावंताचा महाराष्ट्र राज्यामध्ये होतो आहे हे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या अवतीभवतीच लोक साहित्याचे उपासक आहेत पण लिखित स्वरूपात त्यांना कोणीही समोर नाही. पिढ्यान पिढ्या या लोकसाहित्याचा वारसा पुढे पुढे नेत असताना त्यात अस्सल जुने लोकसाहित्य कालबाह्य ठरत आहे. केवळ जुन्या परंपरा आहेत म्हणून त्या काही प्रमाणात चालू ठेवण्याचीच परंपरा आता सुरू झाली आहे. ही परंपरा अशीच राहिली तर भविष्यकाळात या लोकसाहित्याचा अमोल ठेवा आपल्यातून नाहीसा होईल आणि जगणे निरस होईल. म्हणून आपल्या अवतीभवतीच्या या लोककलेचा शोध घेऊन मी ते प्रत्यक्ष जतन करण्याचा प्रयत्न करते याचा मला आनंद आहे. जवळजवळ वीस वर्ष माझं हे काम चालू आहे. केवळ मला पुरस्कार मिळावेत म्हणून मी हे काम करत नाही तर माझी ती आवड आहे. पुढील काळाची ती निकड आहे. हे मला समजल्यामुळे मी या क्षेत्रात संशोधन सुरू केले” असे प्रतिपादन केले. गोपुरी, कणकवली येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी गोव्यातील पर्यावरणवादी व इतिहास संशोधक डॉ. राजेंद्र केरकर कणकवलीतील नाट्य चळवळीचे कार्यकर्ते वामन पंडित , चित्रकार नामानंद मोडक, कवी अनिल धाकू कांबळी, कवयित्री सरिता पवार, लोक गायिका शलाका मेस्त्री, गोव्यातील कलावंत शुभदा च्यारी व नाईक ताई, प्रा. नारायण राणे, चार्टर्ड अकाउंटंट मृणाली कुंभार, गोपुरीचे विनायक सापळे, किरण कदम, किशोर कदम, कवी सिद्धार्थ तांबे, कवयित्री कल्पना मलये आदी मान्यवर उपस्थित होते. गोव्यातील पर्यावरणवादी राजेंद्र केरकर यांचा यावेळी शाल व पुष्प देऊन प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गोव्यातील कलावंत शुभदा चारी व नाईक मॅडम यानीपरंपरागत गीतांचे नाट्यमय सादरीकरण करून या कार्यक्रमाची शोभा वाढविली. मालती मेस्त्री व शलाका मेस्त्री यांनीही यावेळी लोकगीतांचे गायन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री कल्पना यांनी केले तर् प्रतिष्ठानचे कार्यवाह मोहन कुंभार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.