कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकास होण्यासाठी प्रत्येकाने ‘सिंधुदुर्ग फस्ट’ हा दृष्टिकोन ठेवून काम केले पाहिजे ; मंत्री नितेश राणे*

*कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेह मेळावा संपन्न*

*कणकवली ः प्रतिनिधी*

जगात प्रत्येक देशाचा विकास हा गतिमानतेने होत आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकास होण्यासाठी प्रत्येकाने ‘सिंधुदुर्ग फस्ट’ हा दृष्टिकोन ठेवून शासन व प्रशानसाच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. पुढील काळात ‘एआय’ च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांना सक्षम करण्याचा आपला मानस आहे. येत्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या नव्या टप्प्यावर घेवून जाणार आहे, त्यासाठी पत्रकार आणि जिल्हावासियांची साथ आपल्याला हवी आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा रविवारी येथील भगवती मंगल कार्यालयात संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून व आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, उपाध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, उद्योजक हनुमंत सावंत आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पालकमंत्री नितेश राणे यांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अन्य मान्यवरांचाही कार्यकारणी पदाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार राजन कदम, शशी ताटशेट्ये स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिलिंद पारकर, अनिल सावंत स्मृती ग्रामीण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अस्मिता गिडाळे, उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार संजोग सावंत, पत्रकार सन्मान पुरस्कार संजय पेटकर, यशस्वी उद्योजक पुरस्कार हनुमंत सावंत, सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तानाजी रासम यांंना देवून गौरविण्यात आले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या राजकीय वाटचालीमध्ये पत्रकारांचे योगदान खूप मोठे आहे. कणकवली तालुक्यातील प्रत्येक पत्रकाराला मी वैयक्तितरीत्या ओळखतो. त्यांच्या सुखदु:खात मी नेहमीच सहभागी असतो. त्यांच्याशी असलेले माझे नाते मैत्रीपूर्ण व कौटुंबिक आहे. यापुढील काळात हे नाते अधिक
वृध्दिंगत होईल. देशात एनडीएचे तर राज्यात महायुतीचे स्थिर सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सर्व क्षेत्रात पुढे नेण्याचा आपला मानस आहे. जिल्ह्याचा मला गतिमान व पादर्शकपणे विकास करायचा आहे. माझे राजकीय विरोधक माझ्यावर टीका व आरोप करीत आहेत मात्र, मी जिल्ह्याच्या विकासाकडे फोकस केल्यामुळे त्यांच्या टीका अथवा आरोपांकडे फारसे लक्ष देत नाही. मनात कुठलेही हेवेदावे न ठेवता, राजकारण न आणता जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलवाहतूक सुरू व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरू असून यंदाच्या गणेशोत्सवापर्यंत चाकरमान्यांना जलवाहतूकीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा नियोजनाला उपलब्ध होणारा निधी अखर्चित राहणार नाही यादृष्टीने प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. यापुढील काळात जिल्ह्याच्या विकासासासाठी अधिकचा निधी मिळावा यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. जगामधील होणार्‍या बदलांचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी वर्षातून एकदा विकसित देशांचा दौरा केला पाहिजे. पत्रकारांचा हा दौरा घडवून आणण्यासाठी आपण सहकार्य करेन. सिंधुदुर्गातील पर्यटनवृद्धीसाठी 2026 मध्ये ‘झी अवॉर्ड’ कार्यक्रम सिंधुदुर्गात घेणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले.
अजयकुमार सर्वगोड म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृत व बुध्दीवंतांचा जिल्हा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंतापदावर जिल्ह्यात काम करताना तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे कोट्यवधींची कामे करू शकलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढत असून जिल्ह्याचा विकास गतिमान झाला आहे. सिंधुदुर्गवासियांनी मला दिलेले प्रेम, आपुलकी मी कद्यापही विसरणार नाही, असे सर्वगोड यांनी सांगितले.

उमेश तोरसकर म्हणाले, कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित केला जाणारा पुरस्कार वितरण व कौटुंबिक स्नेहमेळावा कार्यक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमांचे अनुकरण अन्य तालुक्यातील पत्रकार संघ करीत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांचे जनतेशी व पत्रकारांशी आपुलकीचे नाते आहे, हे नाते अधिक वृध्दिंगत होईल. माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत म्हणाले, राज्यातील अधिसुचिती पत्रकार निवड समितीची बैठक राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होत असते.

यंदाची बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्हा पत्रकार संघ व कणकवली तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून राबविल्या जाणार्‍या उपक्रमांचे त्यांनी कौतूक केले.
यावेळी हनुमंत सावंत, राजन कदम यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार संघाला नेहमीच सहकार्य करणारे चंद्रशेखर उपरकर तसेच पत्रकार संतोष राऊळ, लक्ष्मीकांत भावे यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित सावंत, सुत्रसंचालन राजन चव्हाण तर माणिक सावंत यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार संतोष वायंगणकर, अशोक करंबेळकर, पत्रकार संघाचे सचिव माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे, उपाध्यक्ष अनिकेत उचले, दिगंबर वालावलकर, कार्यकारणी सदस्य, कणकवली तालुक्यातील पत्रकार व कुटुंबिय बहुसंख्येने उपस्थित होते. दुपारच्या सत्रात कौटुंबिक स्नेहमेळाव्याअंतर्गत पत्रकारांच्या कुटुंबियांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!