*कोंकण एक्सप्रेस*
*नारींग्रे सोसायटीमधील सुमारे १७ लाखाच्या अपहार प्रकरणी संशयिताला जामीन मंजूर*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
नारींग्रे वि.का.स. सेवा सोसायटीमध्ये सन २०२२-२०२३ या कालावधीत सचिव म्हणून कार्यरत असताना सोसायटीच्या निधीपैकी रक्कम रुपये १६ लाख ९१ हजार ५५२ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी उमेश चंद्रकांत कदम याला सिंधुदुर्ग जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायानयाने रक्कम रु. ५०,०००/- चा सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी संशयित आरोपीचे वतीने अॅड. कौस्तुभ कमलाकर मराठे यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
नारींग्रे गावातील वि.का.स. सेवा सोसायटीमध्ये सन २०२२-२०२३ या कालावधीत संस्थेच्या कर्जदारांनी कर्जफेडीसाठी भरलेल्या रकमा प्रत्यक्ष खात्यात जमा न करता तसेच संस्थेची बनावट आर्थिकपत्रके तयार करुन आणि खोटा ताळेबंद दर्शवून स्वतःचे फायद्यासाठी रक्कम रु. १६,९१,५५२/- एवढया प्रचंड रकमेचा अपहार करुन संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी नारींग्रे येथील सोसायटीचा तत्कालीन सचिव उमेश चंद्रकांत कदम याचेविरुध्द देवगड पोलीस स्टेशन येथे फसवणूकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा अपहाराचा प्रकार वि.का.स. सोसायटीच्या ऑडीटमध्ये उघडकीला आला होता. संबंधित ऑडीटर यांनी तात्काळ भा. दं. वि. कलम ४२०, ४६५, ४६७, ४०३, ४०६, ४०८ अंतर्गत सचिव कदम याचेविरुध्द अजामीनपात्र गुन्हा दाखल केला होता. देवगड पोलीसांनी आरोपीत याला तात्काळ अटक केली होती. तथापि याकामी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपीला सशर्त जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास अद्याप चालू असून देवगडचे स.पो.नि. श्री. धुमाळ हे तपास करत आहेत.