*कोंकण एक्सप्रेस*
*कष्टकरी महिलांच्या कार्याची फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान व ‘होय महाराजा किचन’कडून दखल*
*मायेची शाल पांघरून त्यांच्या कर्तृत्वाचा केला सन्मान*
*प्रशांत वाडेकर, देवगड*
मध्यमवर्गीय महिला ह्या आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी अनेक ठिकाणी काम करून कुटुंबाला हातभार लावतात. त्यांचे कष्ट, त्यांची धावपळ सारं काही त्यांच्या कुटुंबासाठी असते. त्यांच्या या कष्टाची पहिल्यांदाच दखल घेतली गेली ती ‘फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान’ व ‘होय महाराजा किचन’ देवगडने. त्यांच्या खांद्यावर मायेची शाल पांघरून त्यांच्या कष्टाला बळ दिले. आयुष्यात पहिल्यांदा आपला कोणीतरी सत्कार करतंय या भावनेने या महिला देखील भारावून गेल्या. निमित्त होत ‘फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान’ व ‘होय महाराजा किचन’ च्या महिला दिन समारंभाचं.
महिला दिनाचे अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम झाले पण ‘फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान’ व ‘होय महाराजा किचन’ ने घेतलेला कार्यक्रम काही औरच होता. कष्टकरी महिला, स्वावलंबी महिला, स्वकर्तृत्वावर स्वत:ला सिद्ध करणाऱ्या महिला, वयोवृद्ध आजींच्या कष्टाची देखील दखल या कार्यक्रमात घेतली गेली. इतकच नव्हे तर त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक खेळ, गप्पा, गोष्टी यामुळे या महिलांना एक दिवस त्यांचा असल्याची जाणीव झाली. ‘फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान’ व ‘होय महाराजा किचन’ आयोजित केलेल्या या कार्यक्रमात देवगडमधील तारकर आजी, कुमुदिनी तोडणकर, स्मिता सावंत, छाया यादव, शरयू टुकरूल, कुंदा कुंभार, नीता मोरे, सानिका मसुरकर, साधना निकम, मैथिली खोबरेकर, सोनल उत्तेकर, कुंदा गोलतकर, मानली ईलावडे, झिपलाईन महिला टीम यांचा सन्मान केला.
या सन्मान सोहळ्यासाठी ‘फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान’ व ‘होय महाराजा किचन’ च्या संचालिका कु. वैष्णवी जोईल, सौ, सुप्रिया सुधाकर जोईल यांच्यासह प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेलिब्रेशन केक कॅफेच्या संचालिका सौ. शीतल कदम, नागरी पतसंस्थेच्या महाव्यवस्थापिका सौ. विद्या माणगांवकर, सौ. अनुश्री पारकर, सौ. तृप्ती पारकर तसेच फ्लाईंग कोकण प्रतिष्ठान’ व ‘होय महाराजा किचन’च्या टीमने सहकार्य केले.