*कोंकण एक्सप्रेस*
*वाचनालयाच्या नुतन इमारतीसाठी सर्वोतोपरी मदत-मनिष दळवी*
*सातेरी वाचनालयातर्फे जीवनगौरव व कर्तृत्वान पुरस्कारांचे वितरण*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
श्री देवी सातेरी वाचनालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वाचकांना विविध पुस्तकरूपी साहित्य उपलब्ध झाले आहे. साहित्यसेवेसोबतच परिसरातील उल्लेखनीय व्यक्तींची दखल घेऊन आयोजित केलेला पुरस्कार सोहळासुद्धा वाखणण्याजोगा असल्याचे गौरवोद्गार जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी काढत वाचनालयाच्या नुतन इमारतीसाठी आणि प्रगतीसाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते जीवनगौरव व कर्तृत्ववान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा ३० मार्च रोजी साई योगेश्वरी मंगल कार्यालय, वेतोरे येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समिधा नाईक, वेतोरे-वरचीवाडी सरपंच प्राची नाईक, उपसरपंच विक्रांत सावंत, वजराट सरपंच अनन्या पुराणिक, पंचायत समिती माजी उपसभापती स्मिता दामले, राधाकृष्ण वेतोरकर आदी उपस्थित होते.
शेतकरी विजय नाईक, माजी मुख्याध्यापक प्रभाकर नाईक तसेच साहित्यिक अजित राऊळ यांना जीवनगौरव तर सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, उद्योजिका आरती शेणवी दै.सकाळचे म्हापण प्रतिनिधी संदिप चव्हाण, कृषी संगम सखीच्या विलासिनी नाईक यांना कर्तृत्वान पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रंथप्रदर्शनही आयोजित केले होते. त्याचेही उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले. तर आभार दिपक नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातेरी वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे यांच्यासह चारूशिला वेतोरकर, सिद्धेश राऊळ, प्रसाद राऊळ, सागर शिरोडकर, समिर राऊळ यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, श्री देवी सातेरी वाचनालयातर्फे महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा‘ कार्यक्रम आयोजित केला होता. यात विणा गावडे या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर यशश्री नाईक आणि मधुरा गोगटे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. या सर्वांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याचे सूत्रसंचालन अभय आरोंदेकर यांनी केले.