*कोंकण एक्सप्रेस*
*पेंढरी विद्यालयात स्मार्ट क्लासरूमचा शुभारंभ*
*विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि बौद्धिक क्षमता उंचावणार*
*इंडस टावर्स लिमिटेडचा सामाजिक उपक्रम*
*शिरगाव | संतोष साळसकर*
इंडस टावर्स लिमिटेडच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे.
मुख्याध्यापक सत्यपाल लाडगावकर यांनी यावेळी स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अध्यापन अधिक परिणामकारक होईल. डिजिटल साधनांच्या सहाय्याने विद्यार्थी अवघड संकल्पना सहज समजू शकतील, त्यामुळे शिक्षण अधिक प्रभावी आणि आकर्षक बनेल असे मत व्यक्त केले.
स्मार्ट क्लासरूममध्ये एलईडी स्मार्ट टीव्ही, संगणक प्रणाली, प्रिंटर तसेच विद्युत बॅकअपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना व्हिज्युअल लर्निंगचा लाभ मिळणार असून डिजिटल साक्षरतेला चालना मिळेल.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, गावप्रमुख बा.का. गुरव, सरपंच मंगेश आरेकर, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अविनाश पाटील, सुरज मगर, सुरज तोडकर यांनी तांत्रिक सहाय्य प्रदान केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांमुळे जागतिक स्तरावरील ज्ञानसंपत्ती सहज उपलब्ध होईल. त्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि बौद्धिक क्षमता उंचावेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
विद्यालय व संस्थेच्या वतीने इंडस टावर्सच्या या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त करण्यात आले.