*कोकण Express*
*मनाई आदेश भंग प्रकरणी शिवसेनेच्या त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा*
*कणकवली तालुका भाजपा शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांनी २७ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू केलेला असताना कणकवली शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी बेकायदेशीर जमाव करून आमदार नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी व फलकबाजी केल्याबद्दल या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कणकवली तालुका भाजपा शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, १७ मार्च रोजी शिवसेना कार्यालयासमोर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात बेकायदा जमाव केला. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, ललित घाडीगावकर, निसार शेख, उमेश गुरव, प्रतीक रासम, सचिन पवार, किरण वर्दम अशा सुमारे २० ते २५ कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या मनाई आदेशाचा शिवसेना कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक भंग झाला आहे. तसेच त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तरी संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी भाजपा शिष्टमंडळा तर्फे करण्यात आली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,अण्णा कोदे,संदीप मेस्त्री,रुपेश कानडे,शिशिर परुळेकर, गणेश तळगावकर,नितीन पाडावे,सुभाष मालंडकर,सागर राणे,निखिल आचरेकर,संदेश सावंत,पपू पुजारे,स्वप्निल चिंदरकर,राजवीर पाटील आदी उपस्थित होते.