*कोंकण एक्सप्रेस*
*बीएसएनएल टॉवर सेवेसाठी उपोषणाचा इशारा*
*वेंगुर्ले: प्रथमेश गुरव*
वायंगणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील हरीचरणगिरी तिठा-आवेरा याठिकाणी बीएसएनएल कंपनीचा मोबाईल मनोरा (टॉवर) उभारण्यात आला आहे. सात-आठ महिने होऊनही हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री स्थापित केलेली नसल्यामुळे तो कार्यान्वित होऊ शकलेला नाही. येत्या १५ दिवसांत भ्रमणध्वनी मनोरा कार्यान्वित न केल्यास दि. २१ मार्चपासून या भागातील ग्राहक व नागरिकांसमवेत सावंतवाडी येथील मुख्य बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर तीव्र उपोषण केले जाईल, असा इशारा वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांनी दिला आहे.
भारत संचार निगम लिमिटेड कार्यालय, सावंतवाडीचे जिल्हा प्रबंधक यांना वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार हरीचरणगिरी येथील भ्रमणध्वनी मनोरा कार्यान्वित करण्याबाबत दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हरचिरणगिरी तिठा-आवेरा याठिकाणी भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात आलेला आहे. हा मनोरा मागील सुमारे ७ ते ८ महिन्यांपूर्वी पूर्ण झालेला आहे. अद्यापपर्यंत मनोरा कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आस्थापित केलेली नसल्यामुळे मनोरा कार्यान्वित होऊ शकलेला नाही. मनोरा ज्या जागी बांधलेला आहे, त्याच्या आसपास अन्य कुठल्याही कंपनीच्या ध्वनीलहरी उपलब्ध नाहीत. त्यामुळे येत्या १५ दिवसांत भ्रमणध्वनी मनोरा कार्यान्वित न केल्यास, या मागणीसाठी गावातील सह्या केलेल्या ग्रामस्थांसमवेत दि. २१ मार्चपासून आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. तरी हा मनोरा तात्काळ कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. ही मागणी वायंगणी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर यांनी लेखी पत्राद्वारे सावंतवाडी येथील दुरध्वनी केंद्राच्या सहाय्यक अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ६ मार्च रोजी केली आहे.