कोंकण एक्सप्रेस
मंत्री नितेश राणे यांनी उबाठा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेतले फैलावर
* परिषदेच्या सभागृहात मंत्री नितेश राणे उबाठा आमदारांना भिडले
*तीनवेळा सभागृहाचे कामकाज करावे लागले तहकूब
* छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांचे निलंबन करा
* सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत केली मागणी
* सत्ता असताना घरांवर तक्रार करणाऱ्या,अटक करण्यासाठी दबाव आणणाऱ्या कारकूनचा कोण छळ करत नाही
*मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना झाप झाप झापले
मुंबई
छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले.संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची व्याख्या काय ? असा थेट सवाल करत सत्ता असताना लोकांचा छळ करणाऱ्या,लोकांची घरे तोडण्याची तक्रार करणाऱ्या,केंद्रीय मंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्याचा छळ कसा होईल ? कारकुणाचा कोण छळ करत नाही.त्यामुळे स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्या सोबत करणाऱ्या अनिल परब यांनी शिवभक्तांची माफी मागावी अशी मागणी यावेळी विधान परिषदेत केली.
दरम्यान यावेळी सत्ताधारी भाजप,शिंदे सेना,राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्ष यांच्या आमदारांनी सुद्धा अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत अनिल परब यांना निलंबित करण्याची मागणी केली. या संपूर्ण गदारोळात सभापती राम शिंदे यांनी तीन वेळा कामकाज तहकूब केले.दरम्यान यावेळी विधानपरिषदेचे संतप्त वातावरण पाहून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरळ थेट सभागृहाची माफी मागितली.अनिल परब यांच्यावतीने मी माफी मागतो असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर काही प्रमाणात सभागृहातील वातावरण शांत झाले.