कोंकण एक्सप्रेस
फोंडाघाट महाविद्यालयात संविधान गौरव महोत्सव २०२५ निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
फोंडाघाट प्रतिनिधि : गणेश इस्वलकर
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयमध्ये संविधान गौरव महोत्सव २०२५ निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने २० ते २५ फेब्रुवारी या कालावधीत संविधान जागर करण्यात आला. दि. २०/ २/ २०२५ रोजी हिंदी विभागाच्यावतीने भारतीय राज्यघटनेची ओळख या विषयावर मराठी व इंग्रजी मधून निबंध स्पर्धा घेण्यात आली. तसेच २१/०२/२०२५ रोजी भूगोल विभागाच्या वतीने भारतीय राज्यघटना या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांनी राज्यघटनेतील विविध घटकांवर प्रकाश टाकला. दि.२२/०२/२०२५ रोजी इंग्रजी विभागाच्या वतीने पोस्टर व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी पोस्टर व घोषवाक्याच्या माध्यमातून राज्यघटनेच्या ठळक बाबी दर्शवल्या. त्याचा प्रसार व प्रसार केला. दि.२४/०२/२०२५ रोजी इतिहास विभागाच्यावतीने भारतीय राज्यघटना या विषयावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली. चार गटात संपन्न झालेल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना राज्यघटना या विषयावर प्रश्न विचारण्यात आले, त्यात चार गटात ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. त्यात समता हा गट विजेता ठरला. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संविधान जनजागृती फेरी काढण्यात आली. महाविद्यालय ते फोंडाघाट एसटी बस स्टँडपर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. राज्यघटनेच्या विविध वैशिष्ट्य विषयी घोषणा देत त्यांनी जनजागृती केली. मराठी विभागाच्यावतीने भारतीय राज्यघटना या विषयावर सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांचे व्याख्यान झाले. त्यांनी संविधानाविषयी तसेच संविधानामुळे माणसाच्या आयुष्यातील प्रमुख बदलांची नोंद घेतली. माणसाला माणूस म्हणून समतेचे, न्यायाचे व बंधुतेचे शिक्षण संविधान कसे देते, याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले.
या संपूर्ण अभियानाचे आयोजन महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.