*कोंकण एक्सप्रेस*
*अलौकिक प्रतिभेचा लेखक….. जयवंत दळवी*
*वेंगुर्ला*
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी संपन्न होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर भूषविणार आहेत. देशाच्या राजधानीत ७१ वर्षांनंतर हे साहित्य संमेलन होत आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर हा विशेष लेख ……
कोकणाने मराठी साहित्याला अनेक साहित्य रत्ने दिली. त्यातीलच एक जयवंत दळवी होत. हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. सतरा कथा संग्रह, बावीस कादंबऱ्या (चार अप्रकाशित,) सोळा नाटके, आठ विनोदी, एक प्रवास वर्णन, पाच इतर अशी विपूल ग्रंथसंपदा निर्माण करणारे जयवंत दळवी हे एक अलौकिक प्रतिभेचे साहित्यिक होते. दळवींच्या साहित्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांची अनेक रूपे एक व्यक्ती, एक लेखक, कुटूंब प्रमुख, रसिक, मिस्कील विनोदी, नवोदिताना मार्गदर्शन करणारे, सर्वांशी समरस होणारी व्यक्ती , उदार, मनस्वी, अशी अनेक विलोभनीय रूपे आढळतात.माणूस समजून घेण्यासाठी दळवी जे चिंतन करायचे किंवा ज्या माणुसकीचा ते शोध घ्यायचे ती इश्वरी चेतनेचाच एक रूप होती. माणुसकीचा शोध हेच त्यांचे जीवन होते. त्यांची राहाणी अत्यंत साधी होती. स्वतःच्या ध्येयाची पूर्ण जाण असलेला व त्यासाठी आवश्यक त्या मार्गाचे पूर्ण ज्ञान असणारा आणि निष्ठेने सतत त्या मार्गाने जाणारा असा लेखक ते होते. या निष्ठांमुळेच ते मोठे लेखक झाले. तसेच अगणित माणसांवर छाया धरणाऱ्या मोठ्या वटवृक्षाप्रमाणे ते एक माणूस म्हणूनही खूप मोठे होते.दळवींमध्ये एक खट्याळ ,खोडकर मिस्कील असा ठणठणपाळही लपलेला होता.त्या ठणठणपाळाला अनेक प्रश्न पडतात. त्यातून ते मानवी स्वभावातील व्यंगावर प्रकाश टाकतात.
दळवी हे मानसशास्त्राचे पदवीधर होते. त्यामुळेच ते जिज्ञासू अभ्यासक होते. मानवी मनातील मनोव्यापारासंबंधी त्याना आंतरिक कुतूहल होतै. त्यांच्या कथांचा विषय स्त्री पुरूष पुरूषांच्या गूढ गहन संबंधांचा वेध घेणे हाच असतो. त्या संबंधीचे अनेक प्रश्न ते निर्माण करतात. त्या प्रश्नांवरचं चिंतन त्यांच्या कथांमधून येतं. त्यांना भेटलेली विविध स्वभावाची माणसं विक्षिप्त, तहेवाईक अशी सर्व थरातली असत. ती लेखकांच्या मनात कुठेतरी लपून बसलेली असतात. जेव्हा एखाद्या कादंबरीचा किंवा कलाकृतीचा विचार ते करू लागत तेव्हा त्याना भेटलेली व मनात लपलेली हीच माणसे ढवळून वर येत व तीच मग त्यांच्या साहित्यातही येत. त्यानी आपल्या साहित्यातून माणूस शोधण्याचा प्रयत्न केला. माणूस वरवर दिसतो , बोलतो , वागतो ते त्याचे वरवरचे व्यक्तीमत्व म्हणजे ते व्यक्तीमत्वाचा वरवरचा पृष्ठभाग असतो. पण त्याचे अंतरंग त्यापेक्षा वेगळे असू शकते. कितीतरी इच्छा, वासना, आकांक्षा, कल्पना दडपून टाकलेल्या असतात. ते सर्व खरवडून काढलं तर तेथे विचारांचे व भावनांचे एक वेगळेच रसायन आढळते. त्या आतील भावनिक रसायनाचा शोध घेण्याचा त्यानी प्रयत्न केला.
दुर्गा, संध्याछाया, सूर्यास्त अशा नाटकांमधून त्यानी वृद्धांचे प्रश्न मांडले. त्यांच्या प्रत्येक प्रकारातील साहित्य कृतीवर बोलता येण्यासारखे आहे. पण विस्तारभयास्तव थोडक्यात बोलावे लागते.
त्यांनी आपल्या कथा व कादंबऱ्यांची नाट्य रूपांतरे केली. खरं तर हे तसे अवघड काम. कारण कथा कादंबरी लिहिण्यातील कौशल्ये व नाटकातील कौशल्ये यात खूप फरक आहे. मूळ आशयाला धक्का तर लावायचा नाही आणि तोच आशय नाटकाच्या चौकटीत बसवायचा. हे अवघड काम करण्यासाठी दळवींनी प्रथम नाट्यलेखनाची कौशल्ये समजून घेतली. ती आत्मसात केली आणि नाट्यलेखनाचे आव्हान लीलया पेलले. त्यांच्या कादंबऱ्यांप्रमाणे नाटकंही लोकप्रिय झाली.
त्याना गोरगरिबांबद्दल खूप कळवळा होता. रोज पिशवी घेऊन बाजारात जाणे त्याना आवडत असे. तिथे आजुबाजूच्या खेड्यापाड्यातून आलेल्या गरिब भाजीवाल्याकडून ते खरेदी करत असत. मासे हे त्यांचे आवडते. ते स्वतः मासे खरेदी करत. नुसत्या नजरेवर माशाची जात व ताजे मासे त्यांना ओळखता येत असत. एका म्हाताऱ्या खेडूत बाईकडून ते रोज मिरची व कोथिंबीर यांचे वाटे घेत. समोरचे सगळे वाटे खरेदी करत. म्हातारीही खूश होई. एकदा तिची काहीच हालचाल आढळली नाही. ती मिरचीच्या वाट्यावर गतप्राण होऊन पडली. तिच्या अंत्ययात्रेचा खर्च दळवींनी केला. गोरगरीबांबद्दलचा केवढा अशा अनेक प्रसंगांमधून दिसून येत असे.
त्यांचे लक्ष प्रथम सामान्य माणसाकडे जात असे. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवशी रात्री रस्त्यावर आनंद व्यक्त केला जात होता. जल्लोष चालू होता. लोक आनंदाने नाचत होते. गाणी गात होते. ओरडत होते. तेव्हा एक पत्रकार म्हणून बाहेर पडलेले तरूण पत्रकार जयवंत दळवी मुलाखती घेण्यासाठी निघाले तेव्हा त्यानी ना कोणा नेत्यांची मुलाखत प्रथम घेतली ना श्रीमंतांची ना प्रसिद्ध व्यक्तीची. तर रस्त्याच्या कडेला बसून कागदातून काही खात गप्पा करत बसलेल्या मजुरांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले व त्या मजुरांशी त्यांनी संवाद साधला. अशी सामान्य तळागाळातील माणसे त्यांच्या साहित्यात येत असत.
तसे पाहिले तर सगळेच लेखक हे आपल्या कलाकृतीतील व्यक्तिरेखा व घटना यासाठी त्यांच्या भोवतालावरच अवलंबून असतात. पण दळवींना भोवतालच्या माणसांचे ताण तणाव, अंतर्गत पीळ जाणवले. त्यातूनच त्यांच्या जबरदस्त अशा व्यक्तिरेखा तयार झाल्या. दळवींनी आपल्या लेखनासाठी निवडली ती वेदनाच. माणसांच्या शरीराची आणि मनाची वेदनाच. माणसाची वेदना हा दळवींच्या निरीक्षणाचा आणि चिंतनाचा विषय होती. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिरेखा या दमदार , ठाशीव व प्रभावी बनल्या. व्यक्तिरेखा निर्माण करण्यात लेखक म्हणून त्यांची स्वतःची प्रतिभा, अभ्यास, कल्पकता, ही श्रेष्ठ होती. एक व्यक्ती म्हणून आणि एक समाजाचा घटक म्हणून जगत असताना माणसाची होणारी फरफट त्यानी नेमकी हेरली होती. बुद्धी वाणी , विचार सगळे लाभूनही माणूस हे एक असहाय्य जनावर आहे अशा सत्यापर्यंत ते आले होते. लैंगिकता, वेड, आणि वेदना यांची विविध रूपं त्यानी न्याहाळली आणि त्याविषयी चिंतन केलं. ती रूपं व ते चिंतन दळवींच्या साहित्यातून आलं.
दळवींना एकांत प्रिय होता. ते म्हणतात एकांताचेही दोन प्रकार असतात. निवांतपणे एकटे बसणे हा एक एकांत. आणि दुसरा गर्दीतला एकांत. गर्दीच्या झुंडीच्या झुंडी असल्या तरी त्यातून एकटेच फिरायला त्यांना आवडायचे. संथ चालीने लोकांना पाहात, न्याहाळीत तर कधी पाठलाग करीत चालताना त्यातली काही माणसे मनात शिरतात. काही तर कायमचे मनात वस्तीला येतात. त्यांच्याविषयी लेखकाला काहीही माहित नसते. पण यातूनच लेखकांच्या कल्पनेला मात्र चालना मिळते. त्या माणसांच्या काल्पनिक ओळखी होतात. त्यांचे मन विस्मयचकित होऊन यातूनच विचारातून लेखनप्रक्रिया सुरू होते. दळवींचे साहित्य अशा निरीक्षणातून जन्माला आलेले आहे. मुळात दळवीना लैंगिकता, भ्रमिष्टता, यांचा शोध घेण्याचे वेड होते.
जयवंत दळवी हे एक संवेदनशील लेखक होते. त्यांनी सामान्य माणसे व स्त्रिया यांच्याकडे सहानुभूतीने व करुणेने पाहिले. त्यांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन पाहिला की थक्क व्हायला होते. साठ सत्तर वर्षापूर्वी भोवतालच्या समाजात जे स्त्रींचे चित्र दिसत असे तेच स्त्री जीवनाचे तत्कालीन प्रातिनिधिक चित्रच त्यांनी ‘त्या चौघीजणी ‘ या ‘आत्मचरित्राऐवजी ‘ या पुस्तकातील लेखात दाखवले आहे. पण त्या काळात खुद्द त्या स्त्रियांनाही आपल्यावरील बंधनाची जाणीव नव्हती . ना कुटूंबाला ना समाजाला. हे असंच चालायचे , हेच बाईचे प्राक्तन असते अशी समजूत असलेल्या काळात दळवींनी स्त्री जीवनाविषयी मांडलेले चिंतन मला खूप महत्वाचे वाटते. स्त्रियांविषयी केवळ अनुकंपा व्यक्त करून ते थांबत नाहीत. तर त्या काळातील स्त्री जीवनाचे सूक्ष्म निरिक्षण करून संवेदनशीलतेने भेदक वास्तव मांडतात. त्यातून त्यांचा अधोरेखित होणारा स्त्रीविषयक उदार, मानवतावादी दृष्टीकोन मला खूप मोलाचा वाटतो.
अशाप्रकारे जयवंत दळवी हे कोकणातील एक अलौकिक प्रतिभेचे लेखक होऊन गेले. त्यांच्या स्मृतींना नम्रतापूर्वक अभिवादन करून इथेच थांबते.
*सौ. वृंदा कांबळी*