*कोंकण एक्सप्रेस*
*राजन साळवींच्या राजीनाम्यावर विनायक राऊतांची टीका*
*मुंबई : प्रतिनिधी*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत देखील घातली होती. मात्र आता साळवींनी पक्षाचा राजीनामा दिल्याने यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यानंतर आता राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच माजी खासदार विनायक राऊत यांनी राजन साळवींवर निशाणा साधला आहे. राजन साळवी पराभवानंतर भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक होते असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. पराभवापासूनच राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याचे म्हटलं जात होतं. स्थानिक पातळीवरील नेत्यांसोबत पटत नसल्याने अखेर राजन साळवी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. राजन साळवी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे. विनायक राऊत यांनी राजन साळवींवर नोकर म्हणून काम करण्याची वेळ आल्याचे म्हटलं आहे.
“मला त्याबद्दल काही आश्चर्य नाही. ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मतदारसंघातील लोकांना भेटून भाजपमध्ये जायचं आहे अशा वावड्या उठवल्या जात होत्या. आता अत्यंत नामुष्की राजन साळवींवर आली आहे. भाजपने त्यांच्यासाठी दरवाजे बंद केलेच पण ज्या सामंत कुटुंबियांच्या विरुद्ध गदारोळ उठवत होते त्यांचा नोकर म्हणून काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,” असं विनायक राऊत म्हणाले. आजपर्यंत ते माझ्यावर सगळ्या गोष्टींचे खापर फोडत होते. आता पराभवाची नैतिक जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं.
“भाजपमध्ये जायचं असं ते १०० पेक्षा जास्त बैठकांमध्ये बोलले होते. भाजपने त्यांची कुवत ओळखली. नेहमी पैशाने विकले जाणारे हे महाशय आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना ही जागा दाखवली आहे. दुर्दैवाने सामंत कुटुंबाला शह देण्यासाठी कुणीतरी पाहिजे म्हणून एकनाथ शिंदे यांनी हा केविलवाणा प्रयत्न राजन साळवींच्या माध्यमातून केला आहे. आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही सन्मान दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी एक तास बसून त्यांच्यासोबत चर्चा केली. पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राजन साळवींनी बैठक घेऊन भाजपमध्ये जायचं आहे असं सांगितले होते,” असा दावा विनायक राऊत यांनी केला.