स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आवड,प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे – तुकाराम जाधव

स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आवड,प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे – तुकाराम जाधव

*कोंकण एक्सप्रेस*

*स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आवड,प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे – तुकाराम जाधव*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आपली आवड, अथक प्रयत्न आणि योग्य मार्गदर्शन घेऊन वाटचाल केल्यास यश मिळवता येते असे प्रतिपादन युनिक अकॅडमी पुणे चे संस्थापक श्री.तुकाराम जाधव यांनी केले.

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन शिबिर स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी अनेक संधींवर प्रकाश टाकण्यात आला. ‘युनिक अकॅडमी पुणे’चे संस्थापक श्री.तुकाराम जाधव प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते, त्यांनी आपल्या अनुभवांनी आणि ज्ञानाने विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर नगर पंचायत कुडाळच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक, युनिक अकॅडमी कणकवली शाखेचे श्री. सचिन कोरलेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, डॉ. अजित दिघे उपस्थित होते.

श्री. तुकाराम जाधव यांनी विविध करिअरच्या वाटा, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व आणि त्या परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी पारंपरिक शिक्षणक्रमासोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती दिली, जेणेकरून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होऊ शकतील. उदाहरणांसह त्यांनी विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींच्या कथा सांगितल्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. शिबिरात विद्यार्थ्यांनी जाधव यांना अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले.उदा.यूपीएससी, एमपीएससी परीक्षांची तयारी कशी करावी ? कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना सध्या जास्त मागणी आहे ? यांसारख्या प्रश्नांना जाधव यांनी समर्पक उत्तरे दिली.

श्री. सज्जनकाका रावराणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम आणि योग्य दिशेने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. गीतांजली नाईक यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता आपल्यातील सुप्त गुणांचा विकास करण्याचा सल्ला दिला. योग्य नियोजन व त्यावर कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. सचिन कोरलेकर यांनी युनिक अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांविषयी माहिती दिली. वैभववाडी तालुक्यातील विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्याची गरज आहे असे सांगितले.

यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, अ.रा.विद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एन.व्ही.गवळी यांनी केले तर पाहुण्यांची ओळख डॉ.अजित दिघे यांनी करून दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले. प्रा. रणजित पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!