*कोंकण एक्सप्रेस*
*राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम आलेल्या प्रणव गवस याचे संतोष नानचे यांच्याकडून अभिनंदन*
*दोडामार्ग : शुभम गवस*
अकोला येथे झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कुंब्रल येथील कु. प्रणव भिकाजी गवस याने ६६ किलो वजन उचलत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर प्रणव याचा भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य तथा दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी त्याच्या निवासस्थानी भेट घेत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी प्रणव याला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रिडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शालेय पॉवरलिफ्टींग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हयांतून अकरा स्पर्धक सहभागी झाले होते. १९ वर्षाखालील गटामध्ये खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल बांदा इयत्ता १२ वी चा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आहे. प्रणव भिकाजी गवस याने ६६ किलो वजन उचलत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.
प्रणव याची घरची परिस्थिती बेताची असून त्याने या खेळासाठी अथक परिश्रम घेतले आहे. आणि आता बारावीची परीक्षा होताच तो राष्ट्रीय पातळीवरील खेळासाठी आपले प्रयत्न करत आहे. या खेळासाठी प्रणव याला बांदेश्वर क्लब बांदाचे संदेश सावंत, प्रशिक्षक मनोज नार्वेकर, गणेश वायंगणकर, डॉ. साटम आदींचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. यावेळी संतोष नानचे यांनी प्रणव याला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचेही आश्वासन दिले आहे.
यावेळी तळकट सरपंच सुरेंद्र सावंत भोसले, नवहर्ष युवक कला क्रीडा मंडळ शिरवल बाग चे अध्यक्ष दीलखुष देसाई, कोलझर सोसायटीचे चेअरमन संजय गवस, चंद्रकांत देसाई, दिवाकर सावंत, ज्येष्ठ नागरिक विठ्ठल देसाई, प्रज्योत देसाई व प्रणवचे वडील भिकाजी गवस आदी उपस्थित होते.