*कोंकण एक्सप्रेस*
*बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उत्कृष्ट सेवा द्यावी – महादेव गवस , माजी सरपंच मोर्ले*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील बीएसएनएलची दूरध्वनी सेवा मागील वर्षभरापासून वारंवार विस्कळीत होत आहे. यामुळे ग्राहक वैतागले आहेत. मोर्ले व परिसरातील अनेक मोबाइलधारकांनी बीएसएनएलची सेवा निवडली आहे.
परंतु वीजपुरवठा खंडित झाल्यास क्षणात रेंज गायब होते.त्याच बरोबर अचानक कॉल बंद पडत आहेत. तास-अर्ध्या तासापर्यंत रेंज मिळत नाही. इंटरनेट सेवाही कोलमडत आहे. गावातील 3G असलेल्या टॉवर 4G करण्यात आलेला आहे तरी अजूनही ग्राहकांना 3G इंटरनेटचा वापर करावा लागत आहे. सतत बंद पडत असलेल्या व धीम्या गतीने चालणाऱ्या इंटरनेटला ग्राहक कंटाळले आहेत त्यामुळे कंटाळून अनेक ग्राहकांनी इतर सुविधेचा लाभ घेतला आहे. परंतु आजही शेकडो ग्राहक बीएसएनएलच्या सेवेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत. उर्वरित कंपन्यांपेक्षा दर कमी असल्याने सर्वसामान्य मोबाइलधारकांना बीएसएनएलचा पर्याय सोयीस्कर वाटत आहे.
भ्रमणध्वनी न लागणे, आवाज अस्पष्ट असणे, संभाषण पूर्ण होण्याआधीच संपर्क तुटणे, स्वत:चा आवाज स्वत:च्याच कानावर येणे आदी तक्रारी ग्राहकांमधून येत आहेत. इंटरनेट सेवेचीही हीच तक्रार आहे. इंटरनेट सेवेत व्यत्यय येत असल्याने याचा पोस्ट ऑफिस सेवेवर परिणाम होत असून ग्राहकांचे व्यवहार खोळंबत आहेत. अनेकदा व्यवहार बंद राहण्याची वेळ येत आहे. बीएसएनएल ऑफिसला केबल तुटणे, बॅटरी बॅकप उपकरणे नसणे ही कायमची कारणे आहेत. यामुळे वारंवार सेवा खंडित होते. मोर्ले परिसरात २४ तासातील १० तासही विनाखंडीत सेवा मिळत नाही. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत उत्कृष्ट सेवा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
योग्य व तत्पर सेवा मिळत नसल्याने बीएसएनएलचे ग्राहक दुरावत आहेत. बीएसएनएलची मोबाइल सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहक वैतागले आहेत. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.