लाडक्या बहिणींची चिंता वाढली …?

लाडक्या बहिणींची चिंता वाढली …?

*कोंकण एक्सप्रेस*

*लाडक्या बहिणींची चिंता वाढली …?*

*आता योजनेतील ‘या’ पाच निकषांनुसार होणार पडताळणी !*

*राज्यातील १९ लाख शेतकरी महिलांच्या लाभाची रक्कम कमी होणार!*

*सोलापूर*

विधानसभा निवडणुकीपूर्वी २८ जूनच्या शासन निर्णयानुसार सुरु झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची आता निकषांनुसार पडताळणी सुरु झाली आहे.पहिल्या टप्प्यावर चारचाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरु असून पुढील टप्प्यांवर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहेत, याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी होणार आहे.

लाडकी बहीण योजनेतील तब्बल पाच लाख लाभार्थी (६५ वर्षांवरील, संजय गांधी निराधार व नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी महिला) कमी झाले आहेत. तरीही, योजनेच्या लाभार्थींची संख्या अडीच कोटींवर आहे. राज्यातील सव्वाचार कोटी महिला मतदारांमध्ये अडीच कोटी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न खरोखर अडीच लाखांपेक्षा कमी आहे का, या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात शोधले जाणार आहे.

याशिवाय एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला लाभार्थींचीही पडताळणी होईल. विधानसभेपूर्वी जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावरील समित्यांकडून लाभार्थींच्या कागदपत्रांची काटेकोर पडताळणी होऊ शकली नाही.

त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढली आणि सरकारला तिजोरीतून दरमहा ३,८८० कोटी रुपये द्यावे लागले. त्यासाठी सरकारला कर्जाची मदत घ्यावी लागली आणि विविध योजनांसाठी मागील साडेसात महिन्यांत सरकारने तब्बल एक लाख कोटींचे कर्ज काढल्याची वस्तुस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर आता लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

*आता चारचाकी वाहन असलेल्यांची पडताळणी, पुढे…*

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांकडून परत येणारी रक्कम जमा करून घेण्यासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष तयार करण्यात आले आहे. त्या खात्यात थेट पैसे जमा करता येतील किंवा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात, तालुक्याच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात देखील रक्कम जमा करता येईल.

सध्या चारचाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरु असून पुढील टप्प्प्यातील पडताळणीचे आदेश प्राप्त झाल्यावर त्यासंदर्भात कार्यवाही होईल – रमेश काटकर, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, सोलापूर

*लाडक्या बहिणींच्या पडताळणीचे संभाव्य टप्पे असे…*

* एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक लाभार्थी

* बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणारे

* कुटुंबातील व्यक्तीला निवृत्तिवेतन, तरी लाभ घेणाऱ्या महिला

* अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न

* पाच एकरापेक्षा अधिक जमीन असलेले लाभार्थी

*१९ लाख महिला शेतकऱ्यांचाही लाभ घटणार*

केंद्र सरकारची शेतकरी सन्मान योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी १२ हजार रुपये दिले जातात. राज्यात दोन्ही योजनांचे ९५ लाख ५० हजार शेतकरी लाभार्थी असून त्यात १९ लाख महिला शेतकरी आहेत.

त्या महिलांना दोन्ही योजनांमधून दरमहा एक हजार रुपये मिळतात. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील यातील महिलांचा दरमहा १,५०० रुपयांचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ ५०० रुपयेच दिले जाणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे.

त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील यातील महिलांचा दरमहा १,५०० रुपयांचा लाभ कमी करून आता त्यांना दरमहा केवळ ५०० रुपयेच दिले जाणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्याची माहिती कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!