*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा नेमळे गावचे शक्तीकेंद्र प्रमुख भास्कर चद्रकांत उर्फ बाळू मुननकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
श भारतीय जनता पार्टीचे नेमळे गावचे शक्ती केंद्र प्रमुख भास्कर चद्रकांत उर्फ बाळू मुननकर (४९, रा. पोकळेनगर, नेमळे) यांचे गुरुवारी सकाळी ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सकाळी ८.३० च्या सुमारास कोलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय जनता पार्टीचे अत्यंत प्रामाणिक व धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ते परिचित होते. अलीकडे झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेमळे गावातून महायुतीला जास्तीत जास्त बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. एक उत्कृष्ट संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. शक्ती केंद्रप्रमुख या नात्याने नेमळे गावात भाजपच्या बांधणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला होता.
गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास घरी काम करीत असताना त्यांची प्रकृती ठीक वाटत नसल्याने त्यांना कोलगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती कळताच भारतीय जनता पार्टीचे आंबोली मंडल अध्यक्ष माजी सभापती रवींद्र मडगावकर, भाजपा जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक मनोज नाईक, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, ज्येष्ठ पदाधिकारी गुरुप्रसाद नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मळगावचे माजी सरपंच हनुमंत पेडणेकर, गणेशप्रसाद पेडणेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, नेमळेचे माजी गाव कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ, समीर नेमळेकर, हनुमंत होडावडेकर, दाजी कापडी, केदार भैरे, श्याम कापडी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.
बाळू मूननकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, वहिनी, पुतणे, तीन बहिणी असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास नेमळे पोकळेनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.