कोंकण एक्सप्रेस
दी स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवार्ड साठी मोफत पूर्व उच्च सराव परीक्षेचा जिल्ह्यात शुभारंभ
मुलांनी या परीक्षेकडे रंगीत तालीम म्हणून पहावे, आणि मुख्य परीक्षेत गुणवंत व्हावे; संजना आग्रे
फोंडाघाट :प्रतिनिधी
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा (इयत्ता पाचवी) सन २०२५ ची मोफत सराव परीक्षा नुकतीच संपूर्ण जिल्ह्यात १४४ केंद्र शाळा मधून घेण्यात आली. या परीक्षेत गुणवंत यादी मध्ये येणाऱ्या प्रथम दहा गुणवंतांना दि स्कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवार्ड देऊन विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे…
फोंडाघाट केंद्रावर या परीक्षेचा शुभारंभ सरपंच सौ. संजना आग्रे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आणि सरस्वती पूजनाने करण्यात आला. यावेळी त्यांनी मुलांना शुभेच्छा देताना, या परीक्षेकडे मुख्य परीक्षेची रंगीत तालीम म्हणून पहावे आणि परीक्षेत गुणवंत व्हावे, असे सांगितले. यावेळी सुंदर पारकर, सुनील चव्हाण, अजित कदम, सुशांत चव्हाण, शिल्पा पवार, हर्षदा कांबळे, राजेंद्र गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
फोंडाघाट केंद्र संचालक संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, पार पडलेल्या या सराव परीक्षेसाठी हर्षदा पाटणकर यांनी भोजनाची, रेणुका जोशी यांनी फळांची आणि अजित कदम व सृष्टी गुरव यांनी बिस्किट वाटपाची सोय केली होती. यावेळी पालक वर्ग विद्यार्थी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते