*कोकण Express*
*कुणकेश्वर जत्रोत्सव फक्त ट्रस्ट सदस्य व पुजारींच्या उपस्थितीतच होणार…*
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावू नये यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार जिल्हाधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये दिनांक 11 मार्च 2021 रोजी होणाऱ्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील श्री स्वयंभू देवाचा वार्षिक उत्सव फक्त मंदिराचे पुजारी, ट्रस्ट, देवस्थान समिती सदस्य यांच्या उपस्थितीतच करण्याचे आदेश दिले आहेत.
याविषयी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत. दिनांक 11 मार्च 2021 रोजी पासून होणाऱ्या देवगड येथील श्री स्वयंभू देवाचा वार्षित जत्रोत्सव आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. गर्दी आकर्षित होईल अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे किंवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये, यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी, ट्रस्ट, देवस्थान समितीचे सदस्य यांनीच करायचे असून यासाठी जास्तीत जास्त 50 व्यक्तींची मर्यादा असेल. यात्रेच्या ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच यात्रेतील धार्मिक कार्यक्रमास अन्य व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई असेल, पारंपारिक धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी कोविड – 19 विषयीच्या उपयायोजनांचा अवलंब करण्यात यावा.
या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.