*कोंकण एक्सप्रेस*
*शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह गुजरातमध्ये सापडला*
*मुंबई : प्रतिनिधी*
शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह अखेर सापडला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे अपहरण करण्यात आले होते.त्यानंतर ते बेपत्ता होते. अखेर त्यांची कार गुजरातमधील भिलाडजवळील एका दगड खाणीतल्या पाण्यात सापडली आहे. त्या कारच्या डिकीमध्ये एक मृतदेह सापडला आहे. तो मृतदेह अशोक धोडी यांचा असल्याचं पोलीसांनी सांगितलं आहे.अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पोलीसांना यश आलं असलं तरी त्यांची हत्या कशी झाली आणि त्यामागचा मास्टर माईंड कोण आहे? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसां समोर आहे.
शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या अपहरणाने खळबळ उडाली होती.20 जानेवारीपासून अशोक धोडी हे बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा शोध पोलीस घेत होते. काही आरोपींना अटक करण्यात आली होती.त्यानंतर तांत्रिक तपास ही सुरू होता. शेवटी हा तपास गुजरातमध्ये बंद पडलेल्या दगडाच्या खाणीपर्यंत येवून थांबला.पोलीसांनी खाणीतल्या पाण्यातून अशोक धोडी यांची कार बाहेर काढली. जवळपास 40 ते 45 फूट खोल पाण्यात ही गाडी टाकण्यात आली होती.दोन क्रेनच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यात आली. त्यावेळी गाडीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होते. यावेळी धोडी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी गुजरातचे पोलीसही त्या ठिकाणी दाखल झाले होते. शिवाय पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील ही घटनास्थळी दाखल झाले होते. ही गाडी गुजरातच्या भिलाड गावातल्या एका खाणीत आढळल्याचे पाटील यांनी सांगितले.या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करणे बाकी आहे. ते ताब्यात आल्यानंतर अनेक गोष्टी उलगडतील असंही ते म्हणाले. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला आहे. शिवाय वेगवेगळ्या आरोपींचा वापर या गुन्ह्यात झाला आहे.या प्रकरणाच छडा लावण्यासाठी आठ पथकं तयार केल्याचेही पाटील यांनी सांगितलं. दरम्यान या गाडीतून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.हा मृतदेह सडला आहे. हा मृतदेह अशोक धोडी यांचा आहे. असे पोलिसांनी सांगितले आहे.