*कोंकण एक्सप्रेस*
*बुरखा घालून १० वी-१२ वीच्या परीक्षा देण्याची परवानगी नको : मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र*
*मुंबई : प्रतिनिधी*
सातत्याने हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे.इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. त्यासंबंधी त्यांनी आपले अधिकृत पत्र दादा भुसे यांना दिले आहे.त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर राज्यात पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंबंधी दादा भुसे यांना दिलेल्या पत्रात नितेश राणे यांनी म्हटले आहे की, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या पारदर्शकपणे होणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून परीक्षा देत आहे की नाही, हे तपासणे शक्य होत नाही. त्यामुळे अशावेळी बुरखा घालून परीक्षा देण्यात बंदी घालण्यात यावी.तसेच आवश्यकता भासल्यास तपासणीसाठी महिला पोलिस अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी यांचे नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे.