*कोंकण एक्सप्रेस*
*हळबे महाविद्यालयात “रोजगाराच्या संधी” या विषयावर उद्बोधन कार्यक्रम संपन्न*
*दोडामार्ग : शुभम गवस*
येथील ल. सी. हळबे महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, प्लेसमेंट सेल आणि एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर, मोपा, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने “पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी” या विषयावर एक दिवसीय उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ए. एस. डी. सी. चे एडमिन एक्झिक्यूटिव्ह श्री.सचिन केतकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
दोडामार्ग तालुका हा महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेला आहे. रोजगारासाठी हा तालुका बहुतांशी गोवा राज्यावर अवलंबून आहे. त्यातही अकुशल कामगारांचे प्रमाण अधिक जाणवते. गोव्यामध्ये मोपा विमानतळ झाल्यामुळे विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. विकासाची गंगा परिसरात वाहत असताना महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा या उद्देशाने या उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर ही संस्था मोपा विमानतळ व इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार कुशल कामगार पुरवते. त्यासाठी या संस्थेमार्फत तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांची पुढे संस्थेमार्फत रोजगारासाठी शिफारस केली जाते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केतकर यांनी त्यांच्या संस्थेचे तसेच गी.एम.आर. ग्रूपचे कार्य विशद केले. यावेळी त्यांनी विमानतळावर उपलब्ध असलेल्या फूड अँड बेवरेज सर्व्हिस असोसिएट्स, रिटेल सेल्स असोसिएट, एअरलाइन कस्टमर सर्व्हिस एक्झिक्यूटिव्ह, त्याचबरोबर असिस्टंट इलेक्ट्रिशियन, फील्ड टेक्निशियन, हाऊसकिपिंग मॅन्युअल अटेंडंट, लाईट मोटर व्हेईकल ड्रायव्हर इ. रोजगारांबद्दल माहिती दिली. आतापर्यंत चौदाशेहून अधिक तरुणांना त्यांच्या संस्थेमार्फत रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनीही या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी भविष्यात रोजगार प्राप्त करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी महाविद्यालयात सुरू असलेले संगणक अभ्यासक्रम तसेच इंग्रजी व इतर भाषेचे अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या रोजगारासंदर्भात नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर ए. एस. डी. सी. चे आर.ए.सी. ट्रेनर श्री प्रसाद भरभरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.एल.एल.ई. चे विस्तार कार्य शिक्षक डॉ. सोपान जाधव, आभारप्रदर्शन प्लेसमेंट सेलचे समन्वयक श्री.रामकिसन मोरे तर सूत्रसंचालन कु.साक्षी गवस हिने केले.