सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश*

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती बैठक*

*कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही आरोग्य सेवा सुधारणा बद्दल केल्या सूचना*

*मुंबई : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिल्या. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत ताबडतोब बंद करण्याचे आदेशही मंत्री श्री. मुश्रिफ यांनी दिले. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने ही बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबात मंत्री श्री. मुश्रिफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग शासकीय माहाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यात भरण्याच्या सूचना देऊन मंत्री श्री. मुश्रिफ म्हणाले की, वर्ग तीन आणि वर्ग चारची पदे तसेच तांत्रिक आणि अतांत्रिक पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यास परवानगी दिली आहे. ही पदभरती पारदर्शक व्हावी याकडे कटाकक्षाने लक्ष द्यावे. ही सर्व पदे येत्या 8 महिन्यात भरावीत. तसेच ज्या ठिकाणी जादा पदे आहेत तेथील प्राध्यापक वर्गाची सेवा सिंधुदुर्ग येथे देण्याची व्यवस्था करावी. नर्सिंग महाविद्यालयाची वसतीगृहाची इमारत पाडण्यास आरोग्य विभागाने परवानगी द्यावी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी भाडेतत्वावर जागा घ्यावी, विभागाच्या अधिकाऱ्यांनी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती जाणून घ्यावी आणि करावयाच्या सुधाराणा आणि पुरवावयाच्या सोयी यांची माहिती द्यावी, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

*वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार दर्जेदार द्या;पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना* यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री श्री. राणे यांनी वैद्यकीय महाविद्यालयास साधनसामुग्री पुरवण्याविषयी सूचना दिल्या. तसेच वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे, औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा. अशा सूचना दिल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जादाची 13 एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आहे. त्यापैकी कौशल्य विकास विभागाकडील आयटीआयची 3 एकर जागा देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच समाजिक वनीकरण विभागाकडील 10 एकर जागेसाठी पाठपुरावा करावा, मंत्रिमंडळासमोर लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली असून येत्या मे महिन्यापर्यंत ही पदे भरली जातील. तर वर्ग तीन, वर्ग चार आणि तांत्रिक, अतांत्रिक पदे येत्या 8 महिन्यात भरली जातील अशी माहिती आयुक्त श्री. निवतकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!