*कोंकण एक्सप्रेस*
*पक्ष फोडीच्या उद्योगांपेक्षा उद्योगमंत्र्यांनी डावोसमधून राज्यात उद्योग आणावेत-विनायक राऊत*
*रत्नागिरी : प्रतिनिधी*
रत्नागिरीच्या विमानतळाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, रत्नागिरी येणाऱ्या १७ हजार कोटीच्या प्रकल्पावर बोलण्याऐवजी शिवसेना उबाठा व राष्ट्रवादी फोडण्याची भाषा डावोसला जाऊन उद्योगमंत्री करीत आहेत. महाराष्ट्रासह कोकण, रत्नागिरीच्या हिताचे उद्योग आणण्यापेक्षा यांना गद्दारीची भाषा वापरावी लागतेय हेच दुर्दैव आहे. गद्दारांचे दिवस आता संपले असून भाजपाच्या नेत्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवण्यास सुरुवात केली असल्याची टिका शिवसेना उबाठाचे सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. बुधवारी रत्नागिरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात राउत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर खरमरीत टिका केली. उद्योगमंत्री उदय सामंत हे ज्या विषयासाठी डावोसला गेलेत,त्या विषयावर बोलायचे सोडून ते गद्दारी किती होते, बेइमानीला आपण किती खतपाणी घालतोय अशी दुहेरी स्वप्न पाहताहेत.अशा उद्योगमंत्र्यांच्या विचारांची किव करावीशी वाटत असल्याचे विनायक राउत म्हणाले.
रत्नागिरीत 17000 कोटींचा प्रकल्प येणार असे सामंत यांनी सांगितले. पण तो प्रोजेक्ट येईल न येईल ते आता सोडून द्या,कारण रत्नागिरी विमानतळ करता करता ते थकून गेलेत असाही टोलाही राउत यांनी लगावला.केवळ आणि केवळ बतावण्या करायच्या, थापा मारायच्या यापलिकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय केले हे दाखवून देण्याची आवश्यक असल्याचे राउत यांनी सांगितले आहे. भाजपाने गद्दारांना त्यांची जागा दाखवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे आतासुध्दा दोन पालकमंत्री पदांना स्थगिती देवून भाजपाने त्यांना जे हवे ते केलेले आहे. भाजप या गद्दारांना आता काडीमात्र किंमत देत नसल्पी खिल्ली विनायक राउत यांनी उडवली आहे. पालकमंत्री पदे देताना एकनाथ शिंदे गटाला भाजपाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. उदय सामंतांबददल खा. संजय राऊत जे बोलत आहे त्यात तथ्य असल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले.