*कोंकण एक्सप्रेस*
*तिराळी जलसंपदा विभागात मोठा भ्रष्टाचार ? : कारवाईसाठी अंकुश जाधव यांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग तालुक्यात असलेले तिराळी येथील मातीचे धरण हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, धरण पूर्ण झाले मात्र भ्रष्ट अधिकारी कालव्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यात व्यस्त आहेत, कालवा फुटीचे ग्रहण यामुळेच लागले असून ज्यांठिकाणी गेल्या वर्षी दुरुस्ती केली होती त्या उन्नई बांधऱ्याच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळणे हे याचे उत्तम उदाहरण असून आता बस झाले या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे अशा आशयाचे निवेदन माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केले.
तेरवण मेढे उन्नई बंधाऱ्याचा कालवा काल घोटगे येथे कोसळला यामुळे घोटगे परमे घोटगेवाडी आदी परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असणार आहे त्यामुळे केळी, माड आदी बागायती बरोबर उन्हाळी शेती होरपळणार आहे.मात्र बोगस निविदा काढून मलिदा लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना याच्याशी काहीही देण घेणं नाही,त्यामुळे या कामाची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली असल्याचे अंकुश जाधव म्हणाले.