कामगार कल्याण मंडळातर्फे ९ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धा

कामगार कल्याण मंडळातर्फे ९ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धा

*कोंकण एक्सप्रेस*

*कामगार कल्याण मंडळातर्फे ९ फेब्रुवारीला राज्यस्तरीय कामगार केसरी स्पर्धा*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा यंदा ९ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आयोजित केली आहे.सदरची स्पर्धा ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवस होणार आहे. ही स्पर्धा हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्य/राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जातील महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लिन नंबर (LIN) धारक कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

इच्छुक कुस्तीगिरांनी ३० जानेवारीपर्यंत कार्यक्रम शाखा, हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे प्रवेशिका सादर कराव्यात. स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली यांची माहिती मंडळाच्या www.public.mlQ.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयात तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.

कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रकमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ७५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये, तृतीय पारितोषिक ३५ हजार रुपये व उत्तेजनार्थ पारितोषिक २० हजार रुपये आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५१ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३५ हजार रुपये, तृतीय पारितोषिक २० हजार रुपये व उत्तेजनार्थ पारितोषिक १० हजार रुपये आहे. तसेच विविध पाच वजनी गटात सामने होणार आहेत विजेत्यांना २५ हजार रुपये ते १० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

जास्तीतजास्त कुस्तीगिरांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे व सावंतवाडी कामगार कल्याण मंडळ केंद्र प्रमुख नम्रता आराबेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सौ. आराबेकर (९४२१२६४८००) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!