कोकणी माणसाची मातीशी जुळलेली नाळ अतूट :ॲड.राहूल नार्वेकर

कोकणी माणसाची मातीशी जुळलेली नाळ अतूट :ॲड.राहूल नार्वेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*कोकणी माणसाची मातीशी जुळलेली नाळ अतूट :ॲड.राहूल नार्वेकर*

*सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

देशाची आर्थिक राजधानी व महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील सर्वांत हाय प्रोफाईल मल्टी कल्चरल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान माझ्या सारख्या एका कोकणी माणसाला मिळाला हा तुमचा सन्मान आहे. कारण आम्ही कोकणी माणूस सर्वांना साथ देतो. माझ्या व माझ्या परिवाराच्या यशात सावंतवाडी व सिंधुदुर्गाचा मोलाचा वाटा आहे.त्यामुळे या कोकणच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असेन , अशी ग्वाही महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब तर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित पत्रकारांना संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर,जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष सीताराम गावडे, अध्यक्ष अनंत जाधव आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा कोकणी माणूस नेहमीच पुढे असतो.त्यामळे अध्यक्षपदाची धुरा स्वीकारताना मला कुठेच काटेरी मुकुट दिसला नाही तर दिसला तो स्वाभिमानी कोकणी बाणा व त्यामुळेच मला दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे योग्य व निरपेक्षपणे पार पाडली.मी दिलेल्या निकालाच्या वेळी मला नेहमीच पत्रकारांनी योग्य व समर्थपणे साथ दिली. त्यामुळे पत्रकारांना माझी नेहमीच साथ राहील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

येणाऱ्या काळात कोकण ही महाराष्ट्राचे गेट वे असेल. कोकणात असलेली साधनसामुग्री पाहता पर्यटनाच्या माध्यमातून भविष्यात कोकणाला सोनेरी दिवस प्राप्त होतील. आगामी काळात कोकणातून मुंबईत गेलेला कोकणी माणूस पुन्हा मुंबईतून कोकणात माघारी येईल.कोकणी माणूस कोकणातचं राहून समृद्ध होईल. देशभरात विखरलेला कोकणी माणूस पुन्हा एकत्र कोकणात येऊन कोकणाच्या विकासाला चालना देईल.कोकणच्या मातीत केवळ नैसर्गिक नाही तर सभ्यतेचं वरदानं लाभलं आहे. बॅ. नाथ पै पासून केसरकरांपर्यंत ही मालिका सुरु आहे.कोकणचेच सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री,माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे यांनी महाराष्ट्रासाठी केलेलं गौरवशाली काम ऐतिहासिक ठरलं आहे,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!