*कोंकण एक्सप्रेस*
*दहिबाव नळयोजना दुरुस्तीसाठी ९ कोटीच्या निधीला तांत्रिक मान्यता : मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने मंजुरी*
*देवगड : प्रतिनिधी*
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी दहिबाव अन्नपूर्णा योजनेच्या नळपाणी योजना दुरुस्तीला नऊ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे देवगड- जामसंडेचा पाणीप्रश्न तातडीने सुटण्यास मदत होणार आहे. यामध्ये नवीन पंप बसवणे व ट्रेंच गॅलरीचे काम नीतेश राणे यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याने ही पाणी पुरवठा योजना पुन्हा नवे रूप धारण करणार आहे.
श्री. राणे यांनी कणकवली येथे देवगडच्या पाणीप्रश्नाबाबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये देवगडला पाणीपुरवठा करण्यासाठी कोर्ले- सातंडी धरणावरून नवीन योजना तयार करणे आणि जोपर्यंत ही योजना कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत देवगड- जामसंडेसाठी संध्या अस्तित्वात असलेली दहिबाव अन्नपूर्णा योजना सुस्थितीत आणणे व पाणीपुरवठा करणे असे दोन महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते.
यातील सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे कोर्ले- सातंडी योजनेचे सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. तर दहिबाव अन्नपूर्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी श्री.राणे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे.
या नव्या अंदाजपत्रकानुसार ही योजना सुस्थितीत आणून पुढे चालविण्यासाठी अनेक गोष्टी अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये टेंच गॅलरीची दुरुस्ती, नवीन पंप बसविणे, पंप हाऊसची दुरुस्ती, गुरुत्ववाहिनीची दुरुस्ती, जामसंडे भागातील पाईपलाईनची दुरुस्ती तसेच नेनेनगर येथील पाणी साठवण टाकीची दुरुस्ती आदी कामे अग्रक्रमाने करण्यात येणार आहेत.