*कोंकण एक्सप्रेस*
*सावित्रीबाई फुले अवतरणार साहित्य संमेलनाच्या मंडपात !*
*कासार्डे ; संजय भोसले*
राजापुरातील वाटूळ या गावी होणाऱ्या दहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात प्रत्यक्ष साध्वी सावित्रीबाई फुले अवतरणार आहेत.राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने प्रत्येक ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात अनेक मान्यवर साहित्यिक कोकणात आणून नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचं काम करीत आहे.पुण्यातील नामांकित नेस वाडिया कॉलेजच्या प्राचार्या वृषाली रणधीर या गेले अनेक वर्षे साध्वी सावित्रीबाई फुले यांचे चरित्र आणि विचार समाजापुढे ठेवण्यासाठी ‘ मी सावित्रीबाई फुले बोलतेय ‘ हा एक पात्री प्रयोग करीत असतात.सावित्रीबाई फुले यांच्या पेहरावात असलेल्या वृषाली रणधीर या प्रत्यक्ष आपल्या समोर उभे आहेत आणि आपल्याशी संवाद साधत आहेत असेच वाटते.फेब्रुवारी १ व २ या दोन दिवशी वाटूळ येथे संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात २ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सकाळच्या सत्रात वृषाली रणवीर यांचा एक पात्री प्रयोग बघायला मिळेल.
ज्यांच्यामुळे भारतातील स्त्रियांना शिक्षणाची संधी प्राप्त झाली.भारतातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणून काम करीत असताना सावित्रीबाई फुले यांना तत्कालीन कर्मठ समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले,अपमानित व्हावे लागले तरीही त्यांनी हाती घेतलेले स्त्री शिक्षणाचे पवित्र कार्य थांबवले नाही.त्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकलो नाहीत परंतु वृषाली रणधीर यांच्या माध्यमातून आपल्याला साध्वी सावित्रीबाई फुले समजून घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे.
कोकणातील तमाम आबाल वृद्ध साहित्य रसिकांनी थोर समाज सुधारक साध्वी सावित्रीबाई फुले साकार करणाऱ्या प्राचार्या वृषाली रणधीर यांच्या एकपात्रीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी आवाहन केले आहे.