*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रीय सागरी सुरक्षा व मासेमारीचे नियमन करण्यासाठी ड्रोन आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली कार्यन्वित*
*सिंधुदुर्ग*
अनधिकृत मासेमारीस आळा घालून शाश्वत मासेमारी टिकून राहण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय सागरी सुरक्षा व सुरक्षिततेच्यादृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून मासेमारीचे नियमन करण्यासाठी ड्रोन आधारीत देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप – णाली कार्यान्वित करण्यात आली असून याच्या नियंत्रण कक्षाचे व राज्यातील सात सागरी जिल्ह्यांमधील ड्रोन प्रणालीच्या उड्डाण कार्यक्रमाचे ‘ऑनलाईन’ उद्घाटन गुरुवारी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते मुंबई येथील मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय येथून करण्यात आले. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने ड्रोन प्रणालीचा उड्डाण कार्यक्रम देवगड किल्ला परिसरात सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले व मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकुर, सागर सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर, तारामुंबरी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनायक प्रभू, देवस्थान मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाळेकर, देवगड फिशरमेन्स सहकारी संस्थेचे अध्यक्ष द्विजकांत कोयंडे यांच्यासह माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजप युवामोर्चा देवगड- जामसंडे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, उल्हास मणचेकर आदी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना श्री. राणे म्हणाले, अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन यंत्रणेची मोठी मदत मिळणार आहे. या ड्रोन प्रणालीमुळे अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांची माहिती पुराव्यानिशी प्राप्त होणार असून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे सोयीचे होणार आहे. मात्र यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाला पोलीस प्रशासनाचेही सहकार्य आवश्यक असून संयुक्तपणे त्यांनी ही जबाबदारी पार पाडावी. समुद्रात १२ नॉटीकल मैलच्या बाहेर पर्ससीन नौकांनी मासेमारी करावयाची आहे. मात्र गुजरात, कर्नाटक आदी भागातील परप्रांतीय ट्रॉलर्स हे राज्याच्या जलधी क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्रवेश करून सागरी नियम व कायदे मोडून करून अनधिकृत मासेमारी करीत आहेत. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार नुकसानीत आहेत. त्यामुळे सागरी नियम व कायदे तोडणाऱ्यांवर कडक शासन झालेच पाहिजे. जेणेकरून पारंपरिक मच्छीमारांना मदत व त्यांचे उत्पादन वाढेल. सागरी नियम तोडणाऱ्या नौकांना कोणत्याही प्रकारची मदत सहन केली जाणार नाही, असे निर्देश श्री. राणे यांनी मत्स्य व्यवसाय विभागाला दिले. मुंबई येथील मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार मनीषा कायंदे, मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मंत्री नीतेश राणे यांनी रत्नागिरी येथे गस्तीनौकेवर परप्रांतीय ट्रॉलर्सकडून झाल्याची हल्ल्याची घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची सूचना तेथील मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑनलाईन कार्यक्रमातूनच केली.