*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुर्ले तालुक्यातील पोलिस पाटील यांना जादूटोणा कायद्याचे प्रशिक्षण देण्याची अभाअंनिसची मागणी*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्लेच्या वतीने नुकतीच वेंगुर्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप भोसले यांची सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, जिल्हा संघटक रुपाली पाटील व वेंगुर्ले तालुका उपाध्यक्षा सिमंतीनी मयेकर यांनी भेट घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील सर्व पोलिस पाटील यांना जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा २०१३ ला संमत केला. या कायद्याचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी जिल्ह्यांमध्ये जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली मात्र या समितीमार्फत शाळा, कॉलेज, गावागावात या जादूटोणाविरोधी कायद्याची जनजागृती म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे हिर्लोक तालुका कुडाळ येथील अघोरी पुजेचा प्रकार, पैसा दुप्पट करण्याची सावंतवाडी मधील घटना अशा अनेक घटना जिल्ह्यात वाढत आहेत. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, गैरसमजुती एकमेकांमधील परस्पर द्वेष, स्त्री पुरुष असमानता यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत आणि जादूटोणा करणाऱ्या भोंदू लोकांपासून आजही जात आहेत त्यांच्यापासून सर्वसामान्य जनतेचे शोषण व छळ थांबवण्यासाठी आणि समाजाचे स्वास्थ सुधारण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जादूटोणाविरोधी कायदा २००३ संमत केला. या कायद्याची जर गावा गावातील सर्व पोलीस पाटील यांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली गेली तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊ शकेल आणि गावागावांमध्ये अशा अघोरी प्रकार म्हणजेच जादूटोणा, भानामती करणे असे प्रकार घडत असतील तर त्या घटनांची पोलीस पाटील पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती देऊ शकतात व पुढील अघटीत घडणाऱ्या घटना थांबवता येतील. यासाठी सर्व पोलीस पाटील यांना या कायद्याचे सविस्तर मार्गदर्शन मिळाले तर पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये घटना घडणार नाहीत. त्यामुळे सर्व पोलीस पाटील यांना जादूटोणा विरोधी कायद्याचे मार्गदर्शन करावे अशी लेखी मागणी चर्चा करून करण्यात आली. यावेळी पोलीस कॉन्टेबल कोळेकर, पोलिस कॉन्टेबल रुपाली पाटील उपस्थित होते.