*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीत नागपूर – मडगाव एक्सप्रेसचे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून जोरदार स्वागत*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रवासी संघटना सावंतवाडीच्या लढ्याला यश मिळताना दिसत असून त्याचाचं एक भाग म्हणून नागपूर – मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा देण्यात आला.
ही ट्रेन पहिल्यांदाच सावंतवाडी स्थानकात थांबली. या एक्सप्रेस गाडीचे सावंतवाडी रेल्वे येथे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या वतीने गाडी समोर श्रीफळ फोडून मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. यावेळी मोटरमनसह उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या ट्रेनला सावंतवाडीत थांबा मिळाल्यामुळे आता सावंतवाडी तालुक्यासह वेंगुर्ले, दोडामार्ग येथील प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.
सावंतवाडी थांबा मिळण्याबाबत संघटनेच्या प्रयत्नांना पाठबळ देणाऱ्या खासदार नारायण राणे, आमदार दिपक केसरकर, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व माजी खासदार विनायक राउत यांचे यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेकडून जाहीर आभार मानण्यात आले. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या श्री क्षेत्र शेगावला जाण्यासाठी कोकण वासीयांना या गाडीचा फायदा होणार आहे,
सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे थांबा मंजूर होताचं क्षणी माडखोल येथील रेल्वे प्रेमी प्रितेश भागवत यांनी सावंतवाडी स्थानकातून शेगाव दौऱ्यासाठी ३० तिकीटे बुक करुन या गाड्याच्या सावंतवाडीतील थांब्याबाबत रेल्वेचे आभार मानले.
मडगाव-नागपूर एक्सप्रेसच्या स्वागतासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे पदाधिकारी सागर तळवडेकर,मिहीर मठकर, नंदू तारी, सुभाष शिरसाट,गोविंद परब,मेहुल रेडीज,साहील नाईक, राशी परब,विहांग गोठोस्कर,तेसज पोयेकर,राज पवार, शुभम सावंत, रुपेश रेडीज यांच्यासह सावंतवाडी रिक्षा संघटना पदाधिकारी रेल्वेप्रेमी प्रितेश भागवत,नितेश तेली,नितिन गावडे उपस्थित होते.