*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने व्यवसायाचा गाठला ६ हजार कोटी रुपयांचा टप्पा*
*सिंधुदुर्गनगरी :प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सभासद,ठेवीदार,कर्जदार,ग्राहक,जिल्हा वासीयांच्या माध्यमातून राज्यातील पहिल्या तिन बँका मध्ये समावेश होत सातत्याने ‘अ’ वर्ग ऑडीट प्राप्त होत आहे.या ३१ मार्च अखेर ६ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे.यापूढे जिल्हावासीयांना उत्तमोत्तम बँकिग सेवा देण्यासाठी बॅँक कटीबद्ध असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांची पत्रकार परिषद आयोजीत केली होती.यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे संचालक विठ्ठल देसाई, समिर सावंत, दिलीप रावराणे, प्रकाश मोर्ये आदीसह बॅकेचे अधिकारी उपस्थित होते
यावेळी दळवी म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बॅँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App. IMPS, UPI, E-com, QR-Code, ABPS, BBPS, CTSMicro ATM Door Step Banking, E-mail Account Statement इत्यादी आधुनिक बैंकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी बँकेने रू.६०२५ कोटी व्यवसायाचा टप्पा गाठलेला आहे. व्यवसायाचा हा पल्ला गाठण्यामध्ये बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हावासियांचा मोठा वाटा राहिला आहे. याबद्दल बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी या सर्वांप्रती आभार व्यक्त केलेले आहेत.
चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील डिसेंबर २०२४ अखेर ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देवून ठेव संकलन व इतर बँकिंग सेवा देणे, कर्जदारांना त्यांच्या व्यवसाय व गरजेनुरूप तात्काळ कर्जपुरवठा करणेबाबत बँकेचा नेहमीच अग्रक्रम राहिलेला असून त्यामुळे बँकेचा व्यवसाय, ढोबळ नफा वगैरे सर्व आर्थिक निकष चांगल्या प्रकारे दरवर्षी पालन केले जातात. विविध आर्थिक निकषांच्या आधारे लेखापरिक्षणातून होणाऱ्या मुल्यमापनाच्या आधारे बँकेस वैधानिक लेखापरिक्षणामध्ये सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे. बँकेने आधुनिक बँकिंगचा वेळोवेळी अंगीकार करून राष्ट्रीयीकृत बँकांकडे मिळणाऱ्या विविध आधुनिक बँकिंगच्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यामुळे बँकेचा जुना ग्राहकवर्ग बँकेकडे कायम राहिलाच. त्याचबरोबर विदयार्थी, तरूण, नवउदयोजक बँकेकडे नव्याने ग्राहक म्हणून जोडले गेले. बँकेची आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तापुर्वक प्रगती होत असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या तीन जिल्हा बँकांमध्ये या बँकेचा समावेश होतो ही विशेष बाब आहे.
बँकेचे अध्यक्ष श्री. मनिष दळवी यांनी सर्व जिल्हा वासियांचे यानिमित्त अभिनंदन करून बँकेवरील विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. यापुढेही जिल्हा वासियांना उत्तमोत्तम बँकिंग सेवा देण्यासाठी बँक कटिबध्द असल्याचे सांगितले तसेच यासाठी बँकेच्या सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक व जिल्हावासियांकडून आवश्यक सहकार्य मिळेल असा विश्वास ही दळवी यांनी व्यक्त केला.