*कोंकण एक्सप्रेस*
*कोकण संस्थेच्या माध्यमातून २६ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
जिल्हा रुग्णालयातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी लागणारी मायक्रोस्कॉप मशीन बंद असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची वणवण होत असून जिल्ह्यातील २६ रुग्णांची आज पंत वालावलकर हॉस्पिटल चिपळूण येथे कोकण संस्थेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करण्यात आली.गेले काही महिने जिल्ह्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया होत नसल्याने आणि गरजू रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया व्हावी यासाठी संस्था कार्यरत असून आपल्या स्तरावर संस्था शेकडो मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत आहे. संस्थेच्या वतीने गावागावात जाऊन मोतीबिंदू रुग्ण कॅम्पच्या माध्यमातून शोधून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांची मोफत शस्त्रक्रिया केली जात आहे.यासाठी पंत वालावलकर हॉस्पिटल डेरवण, चिपळूण हे सहकार्य करत आहेत.
कोकण संस्था गेली १३ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक राज्यात कार्यरत असून संस्थेने आपल्या कामाने राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावा गावात कोकण संस्था ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी कौशल्य विकास प्रशिक्षणे, अभ्यास सहली, आरोग्य शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गुड टच बॅड टच, मासिक पाळी व्यवस्थापन, स्त्री जन्माचे स्वागत, स्कुल किट वाटप, पाणलोट विकास, महिला मेळावा, पौष्टिक आहार, गाळमुक्त धरण, स्वच्छता कार्यक्रम, एचआयव्ही, टीबी जनजागृती, पाणी शुध्दीकरण प्रकल्प, बांबू कारागिरांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.
दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११००० हुन अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया होतात त्यातील ६०% पेक्षा जास्त या खाजगी रुग्णालयात होतात, २०% सरकारी रुग्णालयात तर हजारो गरीब रुग्ण हे शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आर्थिक गणित न बसल्याने पुढे येत नाहीत त्यामुळे त्यांना अंधाररमय जीवन जगावे लागते. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्यास हजारो गरीब रुग्णांना जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही, असे मत कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी व्यक्त केले.