*कोंकण Express*
*स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सव ७ जानेवारी रोजी*
*मुंबई : प्रतिनिधी*
स्वामीराज प्रकाशन या संस्थेने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सहयोगाने एकल नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे, जळगाव, अहिल्यानगर आणि गोवा येथील आठ नाटके या महोत्सवात सादर होतील.माहीम येथील यशवंत नाट्य मंदिर येथे मंगळवार ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ११ पर्यंत दिवसभर हा महोत्सव संपन्न होईल.
या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे,नाट्य परिषद अध्यक्ष अभिनेता प्रशांत दामले,ज्येष्ठ कवी अशोक बागवे आणि दिग्दर्शक मंगेश सातपुते यांच्या उपस्थितीत होणार असून समारोप सोहळ्याला दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेता सुशांत शेलार उपस्थित राहणार आहेत.यावेळी अशोक बागवे लिखित ” नाट्यस्वधर्म” या शारदा प्रकाशनच्या ग्रंथाचे आणि अजीतेम जोशी यांच्या “स्मरण रंजन” या स्वामीराज प्रकाशनच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.नाट्य रसिकांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे,असे आवाहन महोत्सवाचे सूत्रधार सुधीर चित्ते यांनी केले आहे.
*रघुनाथ कदम, दत्ता पाटील, रविकिरण आणि आचरेकर प्रतिष्ठान यांचा गौरव !* या महोत्सवात दोन रंगकर्मी आणि दोन रंग संस्था यांचा खास पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे.गेली सहा दशके रंगभूमीची सेवा करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांना स्व. सुभाष घोरपडे स्मृती ‘ सेवाव्रती ‘ पुरस्कार, तर नाशिक येथील लेखक, दिग्दर्शक दत्ता पाटील यांना स्व.अतुल परचुरे स्मृती
‘ रंगसेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याशिवाय गेली ३८ वर्षे बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या रविकिरण मंडळाला स्व. ज्योतीराम कदम स्मृती ‘धुळाक्षर’ पुरस्कार, तर गेली ४८ वर्षे विविध उपक्रम राबविणाऱ्या कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेला प्रबोधन प्रयोग घर, कुर्ला पुरस्कृत ‘ प्रयोग घर ‘ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवात सादर होणारी एकल नाट्य – सांगत्ये ऐका (आविष्कार,मुंबई),द डिसिजन (कादव,अहिल्यानगर),शक्तिमानने स्कर्ट का घातलाय? (#नाटक दहा बाय वीस, मुंबई)
स्टोअर रूमचे काय झाले? ( हिमशिखा,पुणे), नली ( परिवर्तन, जळगाव), कुकुचकु ( भोळे निर्मित,पुणे), यात्रा ( चक्री,पुणे), मुक आक्रोश ( थिएटर फ्लेमिंगो,गोवा)