*कोंकण Express*
*भविष्यकालीन पिढी मूल्यांच्या दृष्टीने सक्षम होण्यासाठी जीवन मुल्य शिक्षण शाळांची गरज : डॉ. नितीन शेट्ये*
सध्य स्थितीत समाज मूल्ये हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत आज लहान मुलांना नियमित शिक्षणाबरोबरच शालाबाह्य शिक्षण देऊन त्यांच्या कला नुसार त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांच्यात मुल्ये रुजवणे आवश्यक आहे. याकरिता गोपुरी आश्रमाने मांडलेला जीवन मुल्य शिक्षण शाळेचा प्रयोग महत्त्वाचा आहे. गोपुरी आश्रमाचे कार्यकर्ते यासाठी मेहनत घेत आहेत ही बाब नक्कीच नोंद घेण्यासारखी आहे, असे प्रतिपादन कणकवली येथील बालरोग तज्ञ डॉ. नितीन शेट्ये यांनी गोपुरी आश्रमात आयोजित जीवन शिक्षण शाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
देशातील महामानवांचा आदर्श भावी पिढी समोर ठेवण्यासाठी अशा स्वरूपाच्या शाळा महत्त्वाच्या आहेत, असेही डॉ.शेट्ये म्हणाले.
यावेळी बोलताना गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले की आजची पिढी बौद्धिक व मानसिक दृष्ट्या सक्षम आहे, परंतु त्यांच्याशी पालक, समाज आणि आजूबाजूची परिस्थिती कशी समायोजित केली जाते हे महत्त्वाचे आहे.
यावेळी गोपुरी आश्रमाचे सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, जीवन शिक्षण शाळेचे संकल्पक संदीप सावंत, विनायक सापळे, संचालिका अर्पिता मुंबरकर, आर्किटेक्ट व गोपुरी आश्रमाचे सभासद योगेश सावंत, बाल वाङ्मयाच्या अभ्यासिका व कवयित्री कल्पना मलये, प्रशिक्षक शंकर राणे तसेच सुरेश रासम, कमलाकर निग्रे, सदाशिव राणे,गुरूप्रसाद तेंडोलकर यांच्यासहित विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजच्या शाळेत मुलांना विविध प्रकारच्या पानाफुलापासून कोलाज पेंटिंग शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांमधील चित्रकलेची सृजनशीलता दिसून आली. आम्हांला आज खूप आनंद मिळाला अशा स्वरुपाची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
मुलांमध्ये असलेली सृजनशीलता या शाळेच्या माध्यमातून विकसित करून भविष्यात वैचारिक, नैतिक आणि सजग व्यक्तिमत्व असलेली पिढी घडावी यासाठी गोपुरी आश्रमाने हा प्रयोग मांडला आहे. प्रत्येक महिन्यातील दोन रविवारी ही जीवन शिक्षण शाळा गोपुरी आश्रमाच्या निसर्ग रम्य अशा चिकूच्या बागेमध्ये भरणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांच्या सजग व्यक्तिमत्व विकासाबरोबरच मुल्य रुजविणारे वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत. आज या शाळेत पहिली ते नववी या वर्गातील १३० मुलामुलींनी सहभाग होता .