*कोंकण Express*
*कोकणातील तरुण पिढी राजकारणी नेत्यांच्या दावणीला बांधली गेल्याने कोकणचा विकास खुंटला*
*राजकारण विरहित सामाजिक संघर्षासाठी तरुणांचे संघटन महत्वाचे : मोहन केळुसकर
*कणकवली ः प्रतिनिधी*
महाराष्ट्रातील सत्ताकारणात अनेक वर्षें पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे कोकण विकासाचा अनुशेष कोटीच्या कोटी उड्डाणाने वाढत चालला होता. ही परिस्थिती पालटण्यासाठी कोकणातील तरुणांनी विकासाच्या प्रश्नांवर एकत्रित येऊन संघर्ष करण्यासाठी ४६ वर्षांपूर्वी कोविआची स्थापना केली. पण त्यापुढील कालावधीत कोकणातील तरुण पिढी राजकारणी नेत्यांच्या दावणीला बांधली गेली. पर्यायाने कोकणचा विकास खुंटला. विकासाच्या रथाची घोडदौड चालू ठेवायची असेल तर राजकारण विरहित सामाजिक संघर्षासाठी तरुणांचे संघटन महत्वाचे आहे, असे प्रतिपादन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी
दादर – मुंबईत शारदाश्रम विद्यालयात केले.
कोकण विकास आघाडीच्या ४ ऑक्टोबर या ४६ सावा वर्धापनदिन आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून केळुसकर हे बोलत होते. व्यासपीठावर सरचिटणीस एकनाथ दळवी होते.
यावेळी बोलताना केळुसकर यांनी ४६ वर्षांपूर्वीही कोकणातील विकास कामांच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रातील नेते सापत्नपणाची वागणूक देत होते. त्यावेळी कोकणच्या विकासाचा अनुशेष तब्बल ३५०० हजार कोटींवर पोचला होता. कोकणच्या विकासाचा निधी उर्वरित महाराष्ट्रासाठी वळविला जात होता असा आरोप करून ते पुढे म्हणाले, तत्कालीन परिस्थितीत कोकणातील निवडून येणारे लोकप्रतिनिधी प्रामुख्याने समाजवादी विचारसरणीचे विरोधक होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षांची मंडळी जाणिवपूर्वक कोकणच्या विकासासाठी जाहिर केलेला निधी अन्य प्रांतात खर्ची घालत होते. ही अन्यायकारक बाब सहन न होणार्या कोकणातील काही तरुणांनी त्याविरुद्ध लढण्यासाठी ४ ऑक्टोबर १९७८ या दसर्याच्या दिनी कोकण विकास तरुण आघाडी या सामाजिक संघटनेची स्थापना केली.
संघटना स्थापनेपासून प्रामुख्याने गावच्या विकासाची निगडित शिक्षण, आरोग्य, वीज, शेती , पक्के रस्ते, एसटी वाहतूक आदी मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले. तसेच कोकणातील अपुरे पाटबंधारे प्रकल्प, मुंबई -कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी हे महामार्ग, कोकण रेल्वे प्रकल्प, अंतर्गत जलवाहतूक आदी विकास कामांच्या प्रश्नी लढे उभारले. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन, संघर्ष सुरू केला. त्यामुळेच सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांची झोप उडाली. प्रश्न मार्गी लागू लागलेत, असे स्पष्ट करून ते म्हणाले, पुर्वीच्या अखंड रत्नागिरी जिल्हाच्या ठिकाणी दोडामार्ग, बांदा आदी भागातील जनतेला रत्नागिरी या जिल्हाच्या ठिकाणी कामासाठी जायचे असेल तर त्यांचे दोन दिवस प्रवासातच जायचे. त्यामुळे आम्ही रत्नागिरी जिल्हाचे विभाजन करुन स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण करण्यासाठी लढा सुरू केला. या लढ्यासाठी विविध सामाजिक संस्थांसह जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच मे १९८१ मध्ये सिंधुदुर्ग या स्वतंत्र जिल्हाची निर्मिती झाली.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग सर्वांगिण विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनीही कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन महिलावर्गांचाही सहभाग वाढला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गणपत तथा भाई चव्हाण यांनी कोविआच्या स्थापनेपासून विकास प्रश्नांवर लढा देताना माझ्या सारख्या अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोकणातील एसटी बस स्थानकांतील परप्रांतीय व्यवसायिकांना हटवून, तसेच नवीन व्यवसायांसाठी कॅन्टीन , स्टाॅल्स मिळवून दिलेत, असे स्पष्ट केले.
यावेळी सर्वंश्री, माजी नगरसेवक विजयकुमार दळवी, रमाकांत जाधव, संतोष दळवी, मनोहर डोंगरे, अंकुश काते, चंद्रकांत आम्रे, सुधीर वेंगुर्लेकर, संजय जाधव, नरेंद्र म्हात्रे, सौ. ज्योती साटम आदींनी कोकणच्या विकासावर मते मांडली. एकनाथ दळवी यांनी सुत्रसंचलन केले.